बार्देशमध्ये सोमवारपासून विशेष ‘मिशन रेबीज मोहीम’

कुत्र्यांचे होणार लसीकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 mins ago
बार्देशमध्ये सोमवारपासून विशेष ‘मिशन रेबीज मोहीम’

म्हापसा : रेबीज विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कुत्र्यांचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने ‘मिशन रेबीज’तर्फे बार्देश तालुक्यात येत्या सोमवार दि. २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पाच दिवसीय विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
शुक्रवारी म्हापसा येथील ज्ञानप्रसारक हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक, सचिव प्रसन्न आचार्य (आयएएस), पशु कल्याण संचालक ज्युली कॉर्फमार्ट, मिशन रेबीजचे संचालक डॉ. मुरुगन पिल्लई, डॉ. स्टेसी सिक्वेरा, गोवा प्राणी महासंघाचे अध्यक्ष के. डी. रॉव, मिरामार रोटरी क्लबचे संदेश गोडवी व अन्य उपस्थित होते.
रेबीजविषयी सार्वजनिक जागरूकता वाढवणे आणि रेबीज लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पशुसंवर्धन संचालनालय, वर्ल्डवाइड व्हेटर्नरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज संस्थेकडून या मोहिमेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमावेळी कला अकादमीमया विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून माहितीविषयक रेबीजवर प्रबोधन करण्यात आले.
मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले की, गोवा रेबीज-नियंत्रित राज्य म्हणून अधिसूचित आहे. तरीही या रोगाला मुळापासून नष्ट करण्यासाठी लोकांचे अपेक्षित सहकार्य हवे. तसेच अॅनिमल बर्थ कंट्रोल ठेवणे तितकेच गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केले जाते, पण घरातील लोक आपल्या पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करण्यास किंचित मागे राहतात. अशा वेळी लोकांनी या लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गोवा हे मिशन रेबीजमुळे रेबीजमुक्त राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कुत्र्यांचे व्यापक लसीकरण आणि निर्बिजीकरण मोहिमेमुळे रेबीजच्या प्रकरणांमध्ये बरीच घट झाली आहे. हा महत्त्वाचा रेबीजमुक्त उपक्रम बार्देश आणि सर्वांसाठी सुरक्षित समुदायाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी सांगितले.

रेबीज मुळापासून नष्ट करण्याचे ध्येय!
रेबीज-नियंत्रित राज्य असूनही गोव्यातील काही भागांत अजूनही रेबीजची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या रोगाला मुळापासून नष्ट करण्यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. बार्देश तालुक्यासाठी ३६ पथकांची स्थापना केली आहे. पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जाणार जाईल, अशी माहिती मिशन रेबीजच्या ज्युली कॉर्फमार्ट यांनी दिली. 

हेही वाचा