आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन

पणजी: नगर नियोजन (टीसीपी) खात्यात आज पाळे-शिरदोण येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित झोन बदलाच्या विरोधात संताप व्यक्त करत मोठा मोर्चा काढला. टीसीपी कायद्याच्या कलम ३९ (अ) अंतर्गत नैसर्गिक जमिनीचे निवासी क्षेत्रात (सेटलेमेंट झोन) रूपांतर करण्याच्या हालचाली सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रस्तावामुळे गावाचे अस्तित्व धोक्यात येईल आणि रस्ते रुंदीकरणामुळे स्थानिक सातेरी देवीच्या मंदिराला धोका निर्माण होईल, असा आरोप करत संतप्त नागरिकांनी मुख्य नगर नियोजक वर्तिका दागूर यांना घेराव घातला.
सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार आणि प्रशासनावर टीका करताना बोरकर म्हणाले की, सरकार केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे, परंतु प्रत्यक्ष कृती काहीच होत नाही. आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आंदोलन करत नसून, आमचे गाव आणि जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. सरकारने तात्काळ हा झोन बदलाचा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा स्थानिकांचा रोष सरकारला महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य नगर नियोजक वर्तिका दागूर यांनी आपली हतबलता व्यक्त केली. हा निर्णय वैयक्तिक नसून नगर नियोजन मंडळाचा (बोर्डाचा) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव रद्द करण्याचे अधिकार केवळ मंडळाकडेच असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. या उत्तरावर असमाधानी असलेल्या आमदार बोरकर आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. जोपर्यंत हा निर्णय रद्द करण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.
विशेष म्हणजे, आंदोलकांनी केवळ ठिय्याच मांडला नाही, तर सोबत चादरी, उशी आणि चूल-भांडी घेऊन कार्यालयातच संसार मांडला. पाळे-शिरदोणसह सांत आंद्रे मतदारसंघातील सर्व अनधिकृत झोन बदल प्रस्ताव रद्द होत नाहीत, तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. सध्या ग्रामस्थ कार्यालयातच ठाण मांडून बसले असून सातेरी देवीची भजने गात त्यांनी आपला निषेध सुरू ठेवला आहे. एवढेच नव्हे, तर नगर नियोजन मंडळाच्या सदस्यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारण्याचा इशाराही विरेश बोरकर यांनी दिला आहे.