तिसवाडी : पाळे-शिरदोनवासीयांचा ‘टीसीपी’त ठिय्या

झोन बदलाविरोधात आक्रमक : आदेश येईपर्यंत खात्याच्या कार्यालयातच रात्र काढण्याचा निर्धार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 mins ago
तिसवाडी : पाळे-शिरदोनवासीयांचा ‘टीसीपी’त ठिय्या

पणजी : पाळे-शिरदोन येथील स्थानिकांनी गावात कलम ३९ (अ) अंतर्गत प्रस्तावित असलेल्या झोन बदलाच्या विरोधात नगर नियोजन खात्यात (टीसीपी) धडक दिली. हा प्रस्तावित बदल मागे घेण्यात यावा, अशी मागणी करत स्थानिकांनी मुख्य नगर नियोजक वर्तिका दागूर यांना घेराव घातला. मात्र, झोन बदल मागे घेण्याचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त स्थानिकांनी टीसीपी कार्यालयातच बसून आपला निषेध सुरू ठेवला आहे.
नगर नियोजन खात्याच्या मंडळाने पाळे-शिरदोन गावातील नैसर्गिक विभाग 'सेटलेमेंट झोन'मध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव टीसीपी कायद्याच्या कलम ३९ (अ) अंतर्गत ठेवला आहे. जर हा बदल झाला, तर गावाचा विनाश होईल, तसेच रस्ते रुंदीकरणामुळे सातेरी देवीच्या मंदिराला धोका निर्माण होईल, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी नगर नियोजन खात्याच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
आमदार वीरेश बोरकर यांचा आक्रमक पवित्रा
स्थानिक नागरिक शुक्रवारी सकाळपासून रात्रीपर्यंत टीसीपी कार्यालयातच ठाण मांडून बसून आहेत. आतापर्यंतच्या घडामोडींनुसार, सांत आंद्रे मतदारसंघातील झोन बदल रद्द करण्याच्या आदेशावर नगर नियोजन सचिवांनी स्वाक्षरी केली असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव नगर नियोजन मंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. आजच्या आज हे झोन बदल रद्द व्हायला हवेत, तोपर्यंत आम्ही कार्यालयातून हलणार नाही, असा इशारा आमदार बोरकर यांनी दिला आहे.

सरकार आम्हाला वारंवार आश्वासने देत आहे, पण ती पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. म्हणूनच आम्हाला पुन्हा पुन्हा टीसीपीच्या दारात यावे लागत आहे. आम्ही येथे वेळ घालवण्यासाठी आलो नसून आमचे गाव आणि जमीन वाचवण्यासाठी आलो आहोत. सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा स्थानिकांचा शाप त्यांना महागात पडेल.
- वीरेश बोरकर, सांत आंद्रेचे आमदार
अधिकाऱ्यांचे म्हणणे, ‘निर्णय मंडळाच्या हातात’
गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांनी स्थानिक आणि आमदारांची मुख्य नगर नियोजक वर्तिका दागूर यांच्याशी भेट घडवून आणली. यावेळी दागूर यांनी स्पष्ट केले की, झोन बदलाचा निर्णय मी घेतलेला नाही, तो नगर नियोजन मंडळाने घेतला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करणे माझ्या हातात नसून मंडळाच्या हातात आहे. यावर उत्तर देताना बोरकर यांनी बजावले की, मंडळाला हा प्रस्ताव रद्द करण्यास सांगावे आणि जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालयातच बसून राहू.

कार्यालयातच संसार मांडणार!

येताना आम्ही चादर, उशी आणि जेवण बनवण्यासाठी चूल व भांडी घेऊन आलो आहोत. फक्त पाळे-शिरदोनच नव्हे, तर संपूर्ण सांत आंद्रे मतदारसंघातील झोन बदलाचे प्रस्ताव रद्द होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. गरज पडल्यास आम्ही नगर नियोजन खात्यातच संसार मांडू, असा निर्धार बोरकर यांनी व्यक्त केला. तसेच हे आंदोलन केवळ कार्यालयापुरते मर्यादित राहणार नाही, तर नगर नियोजन मंडळाच्या सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या सर्व आंदोलक कार्यालयातच बसून असून मंत्र्यांकडून अधिकृत आदेश येत नाही तोपर्यंत तिथेच थांबण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.      

हेही वाचा