शिरदोन रिसॉर्टच्या मालकीणीविरुद्ध गुन्हा दाखल

म्हापसा : शिरदोन (तिसवाडी) येथील एका रिसॉर्टच्या व्यवसायात भागीदारीवर गुंतवलेले ५०.६१ लाख रुपये रकमेचा परतावा न करता पुण्यातील व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी रिसॉर्टच्या मालक माय-लेकीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट २०२३ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडला. याप्रकरणी अश्विन अडसूळ (रा. पुणे महाराष्ट्र) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयितांमध्ये कृष्णा सराफ व सोनाली सराफ (रा. दोनापावला) यांचा समावेश आहे. संशयितांनी वरील कालावधीत शिरदोन येथील सोन्हे गॅस्ट्रोपब द सी रिसॉर्ट या रिसॉर्टच्या व्यवसायात फिर्यादीला ४० टक्के भागीदारीवर पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार फिर्यादींनी एकूण ५८ लाख ११ हजार रुपये या व्यवसायात गुंतवले. नंतर फिर्यादींना भागीदारी नफ्यातील ठरलेला वाटा देण्यास त्यांनी टाळाटाळ केली आणि विश्वासघात केला. गुंतवणुकीच्या रकमेतील फक्त ७ लाख ५० हजार रुपये संशयितांनी परत केले. उर्वरित ५० लाख ६१ हजार रुपये ही गुंतवणूकीची रक्कम परत करण्यास त्या अपयशी ठरल्या. त्यामुळे संशयितांविरुद्ध फिर्यादींनी पोलिसांत दिली.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ४०८, ४२० व ३४ कलमांन्वये संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना बीएनएसएस कायद्याच्या ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपिका पवार करत आहेत.