कवळे गावचे वैभव : श्री भगवती देवस्थान

कवळे हे गाव देवतांच्या पवित्र अस्तित्वाने पुनित झाले आहे. या निसर्गसंपन्न गावात श्री कपिलेश्वर हे प्रसिद्ध दैवत आहे. श्री कपिलेश्वर पंचायतनात श्री कपिलेश्वर, श्री कमलेश्वर, श्री भगवती, श्री वेताळ, श्री गणपती व आगापूर येथील श्री माधव रामेश्वर व गोविंद ही दैवते येतात.

Story: देवभूमी गोवा |
21st February, 11:54 pm
कवळे गावचे वैभव :  श्री भगवती देवस्थान

फोंडा तालुक्यातील कवळे हे गाव देवतांच्या पवित्र अस्तित्वाने पुनित झाले आहे. या गावात प्रवेश केल्यावर दिसू लागतात ती येथील मंदिरे आणि आकाशाला भिडू पहाणारे त्यांचे कळस. सोबतीला निसर्गसौंदर्य मनाला शांती, समाधान देऊन जाते. अशा या निसर्गसंपन्न परिसरात श्री कपिलेश्वर हे प्रसिद्ध दैवत आहे. श्री कपिलेश्वर पंचायतनात श्री कपिलेश्वर, श्री कमलेश्वर, श्री भगवती, श्री वेताळ, श्री गणपती, तसेच आगापूर येथील श्री माधव रामेश्वर व गोविंद ही दैवते येतात. याच पंचायतनात श्री भगवती ही ढवळी येथे स्थायिक झालेली देवता.

मूळ स्थान वरचावाडा ढवळी येथे

ढवळी येथील श्री भगवती मंदिर कधी व कोणी बांधले याबद्दल माहिती उपलब्ध नाही. एका आख्यायिकेनुसार श्री भगवतीचे मूळ स्थान वरचावाडा ढवळी येथे बेहरे यांच्या घरामागे होते. आजही जुने मंदिर व तळीचे अवशेष तिथे पाहायला मिळतात. इतिहास संशोधकांच्या मते, जुन्या मूर्तीचा काळ ६०० वर्षांहून अधिक आहे. १९७०-७५ साली भगवतीचे मंदिर कौलारू होते. ते लाकडी खांबांवर उभे होते. १९८१ साली स्व. हरीभाऊ बोरकर यांच्या पौरोहित्याखाली व देवेंद्र ढवळीकर यांच्या यजमानपदाखाली श्री देवी भगवतीचे गर्भगृह बांधून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हा कार्यक्रम १० फेब्रुवारी १९८१ ते १२ फेब्रुवारी १९८१ या दिवसांत झाला. देवीच्या गर्भगृहाचे काम पूर्ण झाले होते व सर्व भक्तांना मंदिर उभारण्याचा ध्यास लागला होता. त्यादृष्टीने देवीचे महाजन, कुळावी, भक्त सर्वजण आपापल्या परीने कामाला लागले व भगवती देवीने यश दिले. २०१० साली कळस, फरशी खांबे बांधून कौलारू मंदिर उभे राहिले.

मंदिरातील उत्सव

श्री भगवती मंदिरात नवरात्र, जत्रोत्सव, गंधपूजा, श्रावणी शुक्रवार, पालखी असे उत्सव साजरे होतात. भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव माघ शु. त्रयोदशी या तिथीला साजरा केला जातो.

नूतन मंदिराचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण

भक्तगणांचा ओघ वाढत असल्यामुळे जुन्या मंदिरात जागा अपुरी पडू लागली व भगवती देवीचे नूतन मंदिर बांधावे, असा विचार नवीन कमिटीच्या मनामध्ये घोळू लागला. कपिलेश्वर पंचायतनचे अध्यक्ष देवेंद्र ढवळीकर यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान स्वीकारले. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला. प्रसिद्ध वास्तुशिल्प व्यंकटराव शिरगावकर यांनी देवळाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी घेतली. मनोज आमशेकर इंजिनियर यांची साथ त्यांना लाभली व २२ नोव्हेंबर २०२१ रोजी नूतन मंदिराचे भूमिपूजन झाले. स्थानिक ठेकेदार दीपक रघू नाईक यांनी नूतन मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले. आर्थिक तसेच बांधकाम साहित्याची उपलब्धता त्याचप्रमाणे इतर अनेक अडचणींवर मात करून कपिलेश्वर देवस्थान व्यवस्थापन मंडळाने भगवती मंदिराचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केले. व्यवस्थापन समितीचा निर्धार आणि याबाबत भक्तगणांचे आर्थिक साहाय्य याचा इथे उल्लेख करावाच लागेल.

मूर्ती प्रतिष्ठापना

अशा सुंदर बांधलेल्या भगवती नूतन वास्तूचा व नूतन मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा अश्विन वद्य पंचमी, गुरुवार दि. २ नोव्हेंबर २०२३ ते अश्विन वद्य अष्टमी, रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत झाला. या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. 

हेही वाचा