पणजीत अग्निशमन दलाचा ३८ व्या वार्षिक संचलन (परेड) व तपासणी दिन

पणजी : अग्निशामक दलाला लवकरच '११२' या आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीशी (ERSS) जोडण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना पोलीस, अग्निशमन आणि वैद्यकीय सेवा एकाच एकात्मिक आपत्कालीन हेल्पलाइनद्वारे उपलब्ध होतील, अशी माहिती संचालक नितीन रायकर यांनी दिली. शनिवारी पणजीत दलाच्या ३८ व्या वार्षिक संचलन (परेड) व तपासणी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य सचिव यतींद्र मरळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नितीन रायकर यांनी सांगितले की, वार्षिक संचलन दिवस हा दलाच्या कामकाजाची तयारी, शिस्त आणि कार्यक्षमता यांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. याद्वारे आम्ही जीवन, मालमत्ता आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत, याची प्रचिती येते. सन २०२५ मध्ये दलाला एकूण ८,००२ कॉल आले; यात २,८८९ आगीच्या तर ५,११३ आपत्कालीन घटनांचा समावेश होता. या मोहिमांदरम्यान १६१ व्यक्तींचे आणि ८४२ प्राण्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.
खात्यातर्फे पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. वाळपई येथे नुकतेच आधुनिक अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून डिचोली आणि वास्को येथे नवीन केंद्रांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यामुळे राज्याची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक मजबूत होईल. गोव्यातील प्रशिक्षण केंद्र विविध राज्यांमधील अधिकाऱ्यांसाठी व्यापक जनजागृती उपक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे. आतापर्यंत हजारो नागरिक, शालेय शिक्षक आणि 'युवा आपदा मित्रांना' अग्निसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे रायकर यांनी सांगितले.
तंदुरुस्ती कायम राखून सेवा करा
अग्निशामक दलातील जवानांचे धैर्य, समर्पण आणि अथक परिश्रमांमुळे गोवा राज्य अधिक सुरक्षित आहे. जवानांनी आपली तंदुरुस्ती कायम राखून राज्याची सेवा करत राहावी, असे आवाहन आरोग्य सचिव यतींद्र मरळकर यांनी केले.
अग्नी सुरक्षा भत्त्याबाबत प्रस्ताव
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना 'जोखीम भत्ता' (Risk Allowance) देण्याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याला सरकारचा सकारात्मक पाठिंबा असून हा भत्ता लवकरच मंजूर होईल, असे रायकर यांनी स्पष्ट केले.