
पणजी : राज्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (SSR/एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अंतिम यादीतून एकूण १ लाख २७ हजार ४६८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादीत आता १० लाख ५७ हजार ५६६ मतदारांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये ५ लाख ११ हजार ४३६ पुरुष, ५ लाख ४६ हजार १२१ महिला आणि ९ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. वगळण्यात आलेल्या नावांबद्दल काही आक्षेप असल्यास, पुढील १५ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.
| दिनांक | तपशील | एकूण मतदार संख्या |
| २७ ऑक्टोबर २०२५ | प्रक्रिया सुरू झाली तेव्हाची स्थिती | ११,८५,०३४ |
| १६ डिसेंबर २०२५ | मसुदा (Draft) मतदार यादी | १०,८४,९९२ |
| २१ फेब्रुवारी २०२६ | अंतिम (Final) मतदार यादी | १०,५७,५६६ |
शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत गोयल यांनी सांगितले की, राज्यात ही प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाली. त्यावेळी मतदारयादीत ११ लाख ८५ हजार ३४ मतदारांची नावे होती. १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा यादीतून मृत, अनुपस्थित, दुहेरी नाव असलेले अथवा कायमचा पत्ता बदललेले अशा १ लाख ४२ मतदारांची (एएसडी) नावे वगळण्यात आली. मसुदा यादीत ९ लाख २ हजार ५८९ मॅप झालेले, तर १ लाख ८२ हजार ४०३ मॅप न झालेले असे एकूण १० लाख ८४ हजार ९९२ मतदार होते. मॅपिंग न झालेल्या मतदारांना नोटिसा पाठवून सुनावणी घेण्यात आली.
याशिवाय, मॅप झालेल्या मतदारांपैकी ५८ हजार ९२३ मतदारांच्या माहितीत अनियमितता आढळल्याने त्यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. सुनावणीनंतर अनियमितता असणारे तसेच मॅप न झालेले असे एकूण ३८ हजार ७८० मतदार अपात्र ठरवण्यात आले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यावर 'नमुना ६' द्वारे १२ हजार १६६ नवीन मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली, तर ३९ हजार ५९२ नावे वगळण्यात आली. यामुळे मसुदा यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची एकूण संख्या २७ हजार ४२६ (२.५३ टक्के) इतकी आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदारसंघ तसेच बूथनिहाय वगळलेल्या नावांची माहिती आणि अंतिम यादी देण्यात आली आहे. ही यादी 'सीईओ गोवा'च्या संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे गोयल यांनी सांगितले.
१६ हजार पोर्तुगीज पासपोर्ट धारक
गृह मंत्रालय, पासपोर्ट कार्यालय तसेच एफआरआरओ यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार राज्यात १६ हजार ७२१ पोर्तुगीज पासपोर्ट धारक आहेत. यातील ४२८ जणांची नावे मसुदा यादीत आली होती. यामधील ४२० जणांची नावे वगळण्यात आली आहेत. अन्य ८ जणांची नावे लवकरच वगळण्यात येतील.
पुढील प्रक्रिया
अंतिम यादीबाबत पुढील १५ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आक्षेप नोंदवता येतील. तरी देखील समाधान न झाल्यास त्यापुढील ३० दिवसात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे आक्षेप देता येतील असे गोयल यांनी सांगितले.