
मडगाव : दक्षिण गोव्यातील मतदार पुनरीक्षण प्रक्रियेच्या सुरुवातीला ६,३२,०१० मतदार होते. त्यानंतर एसआयआरचा मसुदा तयार झाला, त्यावेळी ५,७६,६०७ मतदार राहिले व ५५,४०३ मतदारांची नावे वगळण्यात आली. आता प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीत एकूण ५,५९,२८२ मतदार असून, आणखी १७,३२५ मतदारांची नावे वगळली आहेत. संपूर्ण एसआयआर प्रक्रियेत दक्षिण गोव्यातील एकूण ७२,७२८ मतदारांची नावे कमी झाली आहेत.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लिंटस यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अंतिम मतदारयादीची प्रत प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी क्लिंटस यांनी सांगितले की, राज्यासह दक्षिण गोव्यात ४ नोव्हेंबर २०२५ पासून मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. या मोहिमेत १६ डिसेंबर २०२५ रोजी मतदारयादीचा मसुदा तयार करण्यात आला. एसआयआर प्रक्रियेआधी दक्षिण गोव्यात ६,३२,०१० मतदार होते. मसुदा यादीत ५,७६,६०७ मतदार आढळून आले होते; यामध्ये मतदार उपलब्ध नसणे किंवा नावे वगळणे यांचा समावेश होता. त्यावेळी २,७७,१३१ पुरुष व २,९९,४६७ महिला मतदार होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी दाव्यांवर घेतलेल्या सुनावणीनंतर, आता अंतिम मतदारयादीत दक्षिण गोव्यात ५,५९,२८२ मतदार आहेत. यामध्ये २,६९,४८८ पुरुष, २,८९,७८५ महिला आणि नऊ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.
दक्षिण गोव्यात ९११ मतदान केंद्रे
एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दक्षिण गोव्यात ९०६ मतदान केंद्रे होती, आता ती ९११ झाली आहेत. दाबोळी मतदारसंघात दोन, कुठ्ठाळीत दोन, वेळ्ळीत एक आणि सावर्डे मतदारसंघात दोन नवीन मतदान केंद्रे वाढवण्यात आली आहेत. तर मुरगाव मतदारसंघातील दोन केंद्रे रद्द करण्यात आली आहेत, कारण तेथील मतदार इतरत्र स्थलांतरित झाले आहेत.
दाव्यासाठी १५ दिवसांचा अवधी
दक्षिण गोव्याची अंतिम मतदारयादी गोवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या यादीत कोणाचे नाव आले नसेल, चुकीच्या भागात नाव गेले असेल किंवा इतर काही त्रुटी असतील, तर पुढील १५ दिवसांत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दावा दाखल करता येईल. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर पुढील १५ दिवसांत राज्य निवडणूक आयुक्तांकडे समस्या निवारणासाठी दाद मागता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एग्ना क्लिंटस यांनी दिली.
सर्व दाव्यांच्या सुनावणीनंतरच अंतिम यादी
परदेशात वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश मतदारांनी आपली नावे आधीच रद्द केली होती. उर्वरित प्रक्रियेसाठी विहित नमुने भरून घेऊन पडताळणी पूर्ण केली आहे. सर्व दाव्यांवरील सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही अंतिम मतदारयादी तयार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात १७६ सेवा मतदार
भारतीय सशस्त्र दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राज्याबाहेर कार्यरत असलेले सशस्त्र पोलीस दल आणि परदेशात भारत सरकारसाठी सेवा देणाऱ्या व्यक्तींना 'सेवा मतदार' (Service Voters) म्हणून नोंदणी करता येते. दक्षिण गोव्यात १७६ सेवा मतदार असून, यात १७१ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.