साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

झोन बदलावरून पाळे शिरदोनवासीय आक्रमक, तर हरमलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st February, 08:49 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९ (अ) विरोधात पाळे-शिरदोन ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन चांगलेच पेटले. सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर आणि स्थानिक आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून टीसीपी कार्यालयातून बाहेर काढले. मोपा विमानतळ परिसरात रेसिंग सुरू असताना अपघाताच्या घटना घडल्या. हरमल येथील वेश्याव्यवसाचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागली. याशिवाय फसवणूक, अपघात, आगीच्या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार

डिचोलीत ग्राफिक डिझाईनच्या दुकानाला भीषण आग

डिचोली येथील मुस्लिमवाडा भागात एका ग्राफिक डिझाईनच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत दुकानातील संगणक, लॅपटॉप आणि इतर महागडे साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

युवतीची फसवणूक प्रकरणी माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा नोंद

करिअरची संधी देण्याचे भासवून मूळ उत्तरप्रदेश मधील एका २३ वर्षीय युवतीची मानसिक, भावनिक व वैयक्तिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली उत्तर गोवा पोलिसांनी माजी मंत्री विनोद पालयेकरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२६ दरम्यान घडला आहे.

मोपा विमानतळ परिसरात रेसिंग कार ट्रॅकच्या मधोमध सुक्या गवताला आग

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) परिसरात सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कार रेसिंग स्पर्धेदरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे मोठी धावपळ उडाली. ट्रॅकच्या मधोमध वाढलेल्या सुक्या कुरणाला आग लागल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आणि स्पर्धा काही तासांसाठी थांबवावी लागली.

सोमवार

लैंगिक शोषण प्रकरणात माजी मंत्री पालयेकरांचा जबाब नोंद

नोकरीची संधी देण्याचे आमिष दाखवून मूळ उत्तरप्रदेश येथील एका २५ वर्षीय पीडित युवतीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी माजी मंत्री विनोद पालयेकर यांचा म्हापसा पोलिसांनी जबाब नोंद केला आहे. पीडितेची मानसिक, भावनिक व वैयक्तिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हरमल किनारी युवतींसह दोन दलाल ताब्यात

हरमलमधील स्थानिक ग्रामस्थांच्या इशाऱ्यानानंतर मांद्रे पोलिसांनी आक्रमक पावले उचलली आहेत. गेल्या ४८ तासांत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण १३ तरुणी आणि दोन दलालांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे हरमलवासीयांनी समाधान व्यक्त केले असून, पर्यटन क्षेत्रातील अनैतिक व्यवसायाला मोठा हादरा बसला आहे.

कदंब बसच्या धडकेत स्कूटरस्वार वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

गोवा वेल्हा, तिसवाडी येथील भुयारी मार्गावरील जंक्शनवर चुकीच्या दिशेने जात समोरून येणाऱ्या दुचाकीला कदंब बसने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रशांत गजानन बागकर (५०, बोगदा, मुरगाव) या वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

मंगळवार


कॅसिनो हटविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

पणजीत मंगळवारी झालेल्या कॅसिनोविरोधातील जागृती बैठकीला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी स्थानिकांसह राज्यभरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडवीत येऊ घातलेल्या नवीन कॅसिनो जहाजाला विरोध केला. गोव्यातील सर्व कॅसिनो कायमस्वरूपी हटवण्यासाठी मुदतीत आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली. नवीन जहाजाच्या विरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

चरावणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

सत्तरीत बिबट्यांच्या लोकवस्तीतील वावरामुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा आणखी एक दुर्दैवी बळी गेला. चरावणे परिसरातील पोलीस कर्मचारी यशवंत गोपाळ गावस (५८) यांच्यावर शुक्रवारी बिबट्याने हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या यशवंत गावस यांचे उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले.

बदली केलेले दोन पोलीस पुन्हा मांद्रे पोलीस स्थानकात

हरमल येथील वेश्याव्यवसाचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केल्यानंतर तत्काळ जिल्हा राखीव विभागात बदली केलेले मांद्रे पोलीस स्थानकातील पोलीस हवालदार राजेश शिरगावकर व कॉन्स्टेबल सर्वेश मांद्रेकर यांची २४ तासांच्या आत पुन्हा मांद्रे पोलीस स्थानकात नियुक्ती करण्यात आली. पोलीस अधीक्षकांकडून याबाबत बिनतारी आदेश जारी करण्यात आला.

बुधवार

‘आमी पणजेकार’ पॅनलची घोषणा

पणजीत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत उत्पल पर्रीकर यांनी ‘आमी पणजेकार’ पॅनलची घोषणा केली. यावेळी माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, वैदेही नाईक, दत्तप्रसाद नाईक आणि मिनीन डिक्रूज उपस्थित होते. महापौर रोहित मॉन्सेरात यांच्या कारभाराला पणजीवासीय कंटाळले आहेत.

‘उटा’ची कार्यकारी समिती बरखास्त, नव्याने निवडणुका घेण्याचे निर्देश

युनायटेड ट्रायबल अलायन्स असोसिएशनची (उटा) २०२२ मधील कार्यकारी मंडळाची निवडणूक रद्दबातल ठरवण्यात आली आहे. संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करून ९० दिवसांच्या कालावधीत निवडणुका घेण्यात याव्यात, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हा निबंधकांकडून जारी करण्यात आला आहे.

कुडणे येथे आगीत घराचा भाग, कार बेचिराख

गुरववाडा-कुडणे साखळी येथील शुभम रामकृष्ण सुर्लकर यांच्या घराच्या पडवी व आतील खोली तसेच बाजूला पार्क करून ठेवलेली स्विफ्ट कार आगीमुळे पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गुरुवार

गोव्यात रेती उपशावर २३ एप्रिलपर्यंत बंंदी कायम

गोव्यातील नद्यांमधून होणाऱ्या रेती उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. रेती उपशासाठी प्रस्तावित असलेले क्षेत्र ‘सीआरझेड’ कक्षेत येत असल्याने, यावर अधिक सखोल विचार करणे आवश्यक असल्याचे सांगत राष्ट्रीय हरित लवादाने रेती उपशावरील अंतरिम बंदी २३ एप्रिल २०२६ पर्यंत कायम ठेवली आहे.

जास्त परताव्याच्या आमिषामुळे ज्येष्ठाने गमावले १.६४ कोटी रुपये

तिसवाडीतील एका ज्येष्ठ नागरिकाला जास्त परतावा देण्याच्या नावाखाली अप्पर सर्किट (यूसी) व इनिशियल पब्लिक ऑफरिंग स्टॉकमध्ये (आयपीओ) रक्कम गुंतवायला लावून १.६४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या आर्थिक फसवणूक प्रकरणातील एक संशयित आरोपी पुष्कर लोकेश गोयल (३२, रा. फरिदाबाद हरियाणा) याला गोवा सायबर गुन्हा विभागाने अटक केली.

कळंगुटमध्ये कारच्या धडकेनंतर वीज ट्रान्सफॉर्मर जळाला

नायकावाडा, कळंगुट येथे गुजरातमधील पर्यटकांच्या कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका कारला आणि नंतर वीज ट्रान्सफॉर्मरला धडक दिली. अपघातात अपघातग्रस्त गाडीतील एकजण जखमी झाला. तर, वीज ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला.

शुक्रवार

मृत युवकाचे दागिने चोरणाऱ्या पोलिसाला अटक

हणजूण येथील अपघातात मृत्यू झालेल्या जस्टर रॉड्रिग्ज याच्या अंगावरील सात ते आठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. पोलीस रॉबर्ट जीपचा चालक असलेल्या साईश पार्सेकर असे या संशयित कॉन्स्टेबलचे नाव आहे.

शिवपुतळा वादासंदर्भात काहींचे जबाब मुरगाव पोलिसांकडून नोंद

मुरगाव बंदर प्राधिकरणाने मालकी हक्कासंबंधी दावा केलेल्या सडा चौकातील जागेवर शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी काहीजणांचे जबाब घेतले आहेत. याप्रकरणी संबंधित शिवप्रेमींनी तेथील जागेसंबंधी त्यांची मते व्यक्त केली आहेत.

वागातोरमधील अलबेली रेस्टॉरन्टला आग

वागातोर येथील अलबेली रेस्टॉरन्टला शार्टसर्किटमुळे आग लागून सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घटनेवेळी हे रेस्टॉरन्ट बंद असल्यामुळे कोणालाही इजा पोहोचली नाही. रेस्टॉरन्टच्या पहिल्या मजल्यावर वीज उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग भडकली.

शनिवार


झोन बदलावरून पाळे- शिरदोनवासीय आक्रमक

नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९ (अ) विरोधात पाळे-शिरदोन ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस संघर्ष आणि वादाचा ठरला. नगर नियोजन (टीसीपी) कार्यालयात शुक्रवारी रात्रीपासून ठाण मांडून बसलेले सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर आणि स्थानिक आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून बाहेर काढले.

पर्यटकांना त्रास देणाऱ्या युट्युबरवर गुन्हा दाखल

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची छेडछाड करणाऱ्या आणि अश्लील वर्तन करणाऱ्या एका युट्युबरविरुद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

लक्षवेधी

गोव्यातील मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अंतिम यादीतून एकूण १ लाख २७ हजार ४६८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादीत आता १० लाख ५७ हजार ५६६ मतदारांची नावे समाविष्ट आहेत. यामध्ये ५ लाख ११ हजार ४३६ पुरुष, ५ लाख ४६ हजार १२१ महिला आणि ९ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.

मांद्रे पोलिसांनी आश्वे मांद्रे येथे हर्षद मधु कुट्टी या ३२ वर्षीय केरळीयन युवकाकडून ३ लाख १५ हजार रुपयांचा मादक पदार्थ जप्त करून त्याला अटक केली.

स्थानिक तसेच विदेशी महिला पर्यटकांशी गैरवर्तन करून त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता मांद्रे पोलिसांनी कर्नाटक येथील तिघांना ताब्यात घेतले.

हरमल येथील खालचावाडा भागात वेश्याव्यवसाय आणि दलालांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू आहे. संबंधितांची नावे पोलीस महानिरीक्षक तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वीच दिली असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावा स्थानिकांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत एस्कॉर्ट साईट आणि वेश्याव्यवसाय बंद न केल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बर्च बाय रोमिओ लेन क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर बिजय कुमार सिंग यांचा जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. क्लबचे लेनचे सहमालक अजय गुप्ता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने २६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. 

हेही वाचा