हडफडेतील बीग बी कॅसिनो सील

१४ कोटी रुपये शुल्क थकबाकी प्रकरणी कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
21st February, 11:58 pm
हडफडेतील बीग बी कॅसिनो सील

म्हापसा : हडफडे येथील रिओ रिसार्टमध्ये थाटलेला मेसर्स बीग बी लीझर एलएलपी कंपनीच्या बीग बी कॅसिनोला गृह खात्याच्या आदेशानुसार उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सील ठोकले आहे. १४ कोटी रुपये शुल्क रक्कम जमा न केल्याच्या कारणास्तव या कॅसिनोविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने फेब्रुवारी २०२८ पर्यंत सुधारित अधिसुचनेनुसार मेसर्स बीग बी लीझर एलेलपी या कंपनीला बीग बी कॅसिनो हा रिओ रिसॉर्टमध्ये सरू करण्यास मान्यता दिली होती. या कंपनीकडून १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२५ या वर्षांचे ३ कोटी रुपये तर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाचे ११ कोटी रुपये मिळून १४ कोटी रुपयांचे वार्षिक आवर्ती शुल्क गृह खात्याकडे जमा केले नव्हते. त्यानुसार गृह खात्याने सदर कंपनीला १२ डिसेंबर २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून थकित शुल्क त्वरीत भरणा करण्याचे निर्देश दिले होते. तोपर्यंत या कॅसिनोचा परवाना स्थिगित ठेवला होता. तरीही संबंधित कंपनीने थकित असलेले १४ कोटी रुपये वार्षिक परतफेड शुल्क भरण्यास टाळाटाळ केली तसेच कॅसिनोचा व्यवहार हा सुरूच ठेवला, असल्याचे आढळून आल्याचे दिसून आल्यावर १७ फेब्रुवारी रोजी गृहखात्याचे अवर सचिव मंथन नाईक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना आदेश जारी केला व संबंधित कॅसिनो तत्काळ सील करावा, असे निर्देश दिले.

या आदेशाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शनिवार २१ रोजी सायंकाळी बार्देश मामलेदार कार्यालयाने पोलीस बंदोबस्तात वरील आदेशाची कर्यवाही करत कॅसिनोच्या इमारतीला सील ठोकले आहे. 

हेही वाचा