पर्वरी पठाराच्या खाली तोर्ड पैठण या निसर्गरम्य गावात श्री गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. पोर्तुगीजांच्या काळात तेथे लपूनछपून धार्मिक विधी केले जात होते. गोवा मुक्तीनंतर तेथे धालोत्सव, श्री सत्यनारायण महापूजा, गणेश जयंती आदी उत्सव होत आहेत.

श्री गणपती देवस्थान हे एक छोटेसे मंदिर पर्वरी पठाराच्या खाली तोर्ड पैठण या निर्सगारम्य गावात वसलेले आहे. या मंदिराचा इतिहास बराच जुना आहे. शेकडो वर्षांपूर्वी या गावात नाईक, भंडारी व गावडा समाजाचे लोक राहात होते. ते खास करून शेती व दुग्ध व्यवसाय करीत असत. पोर्तुगीजांच्या शासन काळात लोकांना खुलेपणाने धार्मिक विधी करायला मिळत नव्हते. त्या काळी हे लोक आपले काम संपवून एका झाडाखाली एकत्र येत होते. ते झाड होते (आपली सुपली). त्या झाडाखाली ते लोक वर्षातून एकदा लपूनछपून पूजा करत होते. तेथे एक चिंचेचे झाडही होते. तेथे ब्राह्मणाचे स्थान होते. त्या जागेत हळूहळू इतर धर्मिक कार्य सुरू झाले. महिलांनी धालोत्सव करायला सुरुवात केली. त्याठिकाणी हळूहळू धार्मिक कार्यक्रमांची संख्या वाढू लागली.
मंदिरासाठी पार्सेकरांकडून ८० मीटर जागा
मंदिर परिसरातील ८० मीटर जागा कै. पांडुरंग पार्सेकर यांनी ग्रामस्थांना मंदिरासाठी दान केली. पूर्वजांनी श्रमदान करून तेथे छोटेसे मंदिर बांधले. त्या मंदिरात गणपतीचे चित्र ठेवून पूजा-अर्चा सुरू करण्यात आली. महिला धालोही करू लागल्या. वर्षातून एकदा तेथे सत्यनारायण पूजाही सुरू झाली. उत्सवांचे औचित्य साधून तेथे नाटकांचे खेळ होऊ लागले. या नाटकांमध्ये गावातील पुरुष मंडळी स्त्रीपात्र रंगवत होते. कार्यक्रमांची व्याप्ती हळूहळू वाढत गेली.
१९९५ साली मूर्तीची प्रतिष्ठापना
या मंदिरात १९९५ साली श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. मंदिरात दर मंगळवारी भजन होऊ लागले. गणेश जयंती, संकष्टी, धालो आदी उत्सव साजरे होऊ लागले. पर्वरी पठार व शेजारील गावांतील भाविकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे जागा अपुरी पडू लागली.
२०१६ मध्ये पहिला जीर्णोद्धार
२०१६ मध्ये भाविकांनी मंदिरापुढील जागेत मंदिराचा विस्तार करायचे ठरवले. त्याप्रमाणे जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले. भाविकांकडून देणगीसाठी भरभरून प्रतिसाद मिळाला. नवीन मंदिराचे काम पूर्ण झाले. एप्रिल २०१८ मध्ये श्री गणेशाच्या मोठ्या मूर्तीची पुन:स्थापना करण्यात आली. हे मंदिर लोकांचे भक्तीस्थान बनले आहे. इथे प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होते.
गावाचा राखणदार श्री तळेश्वर
मंदिराच्या १०० मीटर अंतरावर या गावचा राखणदार श्री तळेश्वर आहे. त्या ठिकाणी एक पिंपळाचे व सतिगोण जुनाट वृक्ष आहे. त्यावर श्री तळेश्वर म्हणून गावच्या राखणदाराचे वास्तव्य आहे. जवळच शंभर मीटर अंतरावर एक छोटेसे पण सुंदर तळे आहे. त्याच्या बाजूला पाण्याचा झरा वर्षभर प्रवाही असतो. तलावाचे पाणी कधी कमी होत नाही. त्या ठिकाणी पावसाळ्यात शेकडो लोक आंघोळीसाठी येतात. त्याची अशी व्याख्यातिका आहे. - त्याला हाक दिली तर तो धावा करणाऱ्याचे रक्षण करतो. पूर्वी पणजीहून म्हापशाला जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नव्हते. लोक खास करून महिला भाजीपाला, फुले घेऊन चालत जात. परत येताना त्यांना रात्र व्हायची. रस्ते, लाईटची सोय नव्हती. येताना ते लोक ‘तळेकरा, पाव रे’ म्हणून हाक मारत असत. चमत्कार असा की, हाक मारणाऱ्या भाविकाला वस्तीपर्यंत जाईपर्यंत कोणतीही अडचण येत नसे. मंदिरात, गावात कोणतेही धार्मिक कार्य करायचे असल्यास श्री तळेश्वराला प्रथम मान दिला जातो.
नित्य कार्यक्रम आणि उत्सव
सध्या मंदिरात मंगळवारी भजनाचा कार्यक्रम होतो. दररोज रात्री ८ वा. शेजआरती होते. मंदिरात वर्षभर संकष्टी, विनायकी, गणेश जयंती, धालोत्सव, गुढीपाडवा, वर्धापनदिन असे विविध कार्यक्रम होतात. गणेश जयंती उत्सवात देवाची पालखी होते. धार्मिक मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.
कार्यकारी समिती,
श्री गणपती देवस्थान ट्रस्ट, तोर्ड-पैठण