पाळे-शिरदोण आंदोलनाचा दूसरा दिवस : झोन बदलाचा वाद विकोपाला!

पोलीस बळ वापरुन कार्यालयातून आंदोलकांना काढले बाहेर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
47 mins ago
पाळे-शिरदोण आंदोलनाचा दूसरा दिवस : झोन बदलाचा वाद विकोपाला!

पणजी: नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९ (अ) अंतर्गत पाळे-शिरदोणमधील झोन बदलाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन आज दुसऱ्या दिवशी गंभीर वळणावर पोहोचले. कालपासून नगर नियोजन (टीसीपी) कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या ग्रामस्थांना आणि सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांना पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यालयाबाहेर काढले. दरम्यान काल एका वृद्ध महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

पाळे-शिरदोण येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्रीपासूनच टीसीपी कार्यालयात मुक्काम ठोकला होता. जोपर्यंत झोन बदलाचे अधिकृत आदेश रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, असा पवित्रा आमदार विरेश बोरकर आणि स्थानिक आंदोलकांनी घेतला होता. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान एका वृद्ध महिलेची प्रकृती अचानक खालावली, ज्यामुळे तणाव अधिकच वाढला. शनिवारी सकाळी पुन्हा एकदा आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी सुरू केली आणि प्रशासनाकडे लेखी आश्वासनाची मागणी केली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आंदोलकांना खेचून बाहेर काढण्यास सुरुवात केली, याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. याच गोंधळात आमदार विरेश बोरकर यांना कार्यालयातून बाहेर काढण्यात  आले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली आहे.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, कलम ३९ (अ) चा वापर करून नैसर्गिक जमिनींचे निवासी क्षेत्रात रूपांतर करून गाव उद्ध्वस्त केला जात आहे. या बदलांमुळे स्थानिक सातेरी देवीच्या मंदिराला आणि गावच्या अस्मितेला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेली ही कारवाई अत्यंत निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांकडून येत आहे. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून, तणावपूर्ण शांतता आहे.