पिळर्णमध्ये महिलेचा विनयभंग; अश्लील हावभाव करणाऱ्याविरुद्ध साळगाव पोलिसांत गुन्हा नोंद!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23 mins ago
पिळर्णमध्ये महिलेचा विनयभंग; अश्लील हावभाव करणाऱ्याविरुद्ध साळगाव पोलिसांत गुन्हा नोंद!

पणजी : बार्देश तालुक्यातील पिळर्ण-कांदोळी रोडवर एका महिलेचा अश्लील हावभाव आणि शब्दांतून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साळगाव पोलिसांनी संशयित सलील साळगावकर (रा. मारा-पिळर्ण) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. ही घटना शुक्रवारी, २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री पावणे दहा ते अकराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलला शुक्रवारी रात्री आपल्या घराबाहेर असताना संशयित सलील साळगावकर याने त्यांना उद्देशून अत्यंत अश्लील शब्दांचा वापर केला.  एवढ्यावरच न थांबता, संशयिताने अश्लील हावभाव करून विनयभंग केला. पीडितेने यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी पोलिसांत दिल्या होत्या, मात्र त्यावर तातडीने कारवाई झाली नाही. अखेर साळगाव पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांशी (PI) चर्चा केल्यानंतर आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सलील साळगावकर याच्याविरुद्ध बीएनएस कलम ७९ आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करणे आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, असे आरोप संशयितावर ठेवण्यात आले आहेत.

या प्रकरणातील एफआयआरची प्रत म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयात आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पणजी आणि पर्वरी येथील नियंत्रण कक्षालाही संदेश धाडण्यात आला आहे. सध्या साळगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.