टोक्याची जत्रा

पौर्णिमेच्या रात्री गावणे पूर्वाचाराच्या मंदिरात दिवजोत्सव असतो. त्यानंतर पूर्वाचाराचा अवसर येतो. त्याच्या हातामध्ये बेतकाठी असते. त्याचबरोबर एक मोठा बांबू असतो. बांबूच्या टोकाला देवाची मूर्ती बसवलेली असते. यालाच ‘टोका’ असे म्हटले जाते.

Story: जत्रा |
20th February, 10:51 pm
टोक्याची जत्रा

फोंडा तालुक्यातील नागेश महारूद्र संस्थान, नागेशी येथे त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने जत्रा भरते. कार्तिक शु. दशमीपासून सतत आठ दिवस चालणाऱ्या या जत्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. परंपरागत दीपोत्सव, दीपराधना, दिवजोत्सव, गंगापूजन, आवळी भोजन, सांगोड उत्सव, रथोत्सव त्याचप्रमाणे ‘टोक्याची जत्रा’ असते.

पौर्णिमेच्या रात्री गावणे पूर्वाचाराच्या मंदिरात दिवजोत्सव असतो. त्यानंतर पूर्वाचाराचा अवसर येतो. त्याच्या हातामध्ये बेतकाठी असते. त्याचबरोबर एक मोठा बांबू असतो. बांबूच्या टोकाला देवाची मूर्ती बसवलेली असते. यालाच ‘टोका’ असे म्हटले जाते. गावणेहून अवसर व सोबत टोका नागेश देवांच्या भेटीसाठी नागेशी मंदिरात येतो. देव पूर्वाचाराच्या भेटीसाठी भाविक हातात नारळ घेऊन उभे असतात. अवसर ठराविक स्थळी थांबून भक्तांना ‘बिबूत’ लावून कौल देतो व नारळाला स्पर्श करतो. संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून येणारा, नवसाला पावणारा असा श्रींचा नावलौकीक आहे. हा नारळ वर्षाची राखण म्हणून श्रद्धेने घरात ठेवतात. कौल देत - देत तीन-साडेतीन वाजता निघालेला अवसर नागेश मंदिरात पोहोचेपर्यंत सकाळचे नऊ-साडेनऊ वाजतात. मंदिरात पोहोचल्यानंतर टोको (बांबूची काठी) आडवी धरतात. मूर्ती असलेले टोक गाभाऱ्याच्या दिशेने करतात व दुसऱ्या टोकावर अवसर आडवा होतो. ‘टोका’ गर्भागारात नेतात व आतील स्वयंभू पिंडीला टोक्याचा स्पर्श करतात. टोक्याची पूजा, आरती, प्रसाद झाल्यानंतर अवसर विसर्जित होतो. श्री नागेश देवाला पूर्वाचारी देव अतिशय प्रिय असल्याने या भेटीनंतर नागेश देवाच्या जत्रेला खरी सुरुवात होते, असे म्हटले जाते. यानंतर दिवजोत्सवाला सुरुवात होते. यावेळी नवदांपत्याच्या गाठवलांचा कार्यक्रम असतो. याचवेळी देव श्री नागेशाला पालखीत बसवून सांगोडात नेतात. देवाच्या तळीमध्ये नौकाविहाराचा कार्यक्रम होतो. नौकाविहारानंतर श्रींची मूर्ती आपट्याच्या पेडावर असलेल्या रथामध्ये बसवतात. रथात बसून देव नागेश आपल्या बहिणीला भेटण्यासाठी बांदोडा येथे महालक्ष्मी मंदिरात जातो. चार-पाच तास तिथे थांबून संध्याकाळी नाचत नाचत पुन्हा नागेश मंदिरात येण्यास निघतो. वाटेत रवळनाथ मंदिर, सौंदेकर वाडा या परंपरागत ठिकाणी पूजा, आरती स्वीकारून मंदिरात परत येतो. त्यानंतर दीपोत्सवाने दिवसभर चाललेल्या उत्सवाची सांगता होते.

दुसऱ्या रात्री गंगापूजन, दीपराधना, नाटक वगैरे कार्यक्रम असतात. तिसऱ्या दिवशी दुपारी वनभोजनाचा आगळा-वेगळा कार्यक्रम होतो. रात्री गंगापूजन, दीपोत्सव, नौकाविहार झाल्यानंतर ‘टोक्या जत्रे’ ची सांगता होते.

नागेश महारुद्र संस्थानात वर्षभर लहान-मोठे उत्सव, धार्मिक कार्यक्रम होतच असतात. पण त्रिपुरी पौर्णिमा व चैत्र पौर्णिमा हे उत्सव प्रसिद्ध आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला साजरा होणारा टोक्याचा उत्सव हा श्रींचा आवडता उत्सव असे मानले जाते.

अंत्रुज महालाची देव-देवतांचे माहेरघर अशी ओळख आहे. बांदिवडे हा निसर्ग संपन्न गाव. आज नागेशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात शमीची झाडे होती. त्याचप्रमाणे या भागात नागांचे वास्तव्य होते. यावरूनच या भागाला ‘नागेशी’ असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. या डोंगराळ भागात लोक आपली गुरे चरायला सोडत असत. असाच एक गृहस्थ आपली गुरे डोंगरावर सोडत असे. दुभत्या गाई दूध काढायची वेळ झाली की घरी येत, पण एक गाय मात्र घरी येताना ओटी रिकामी करून येत असे. रानात कोण बरे गाईचे दूध काढीत असावा ? हे पहाण्यासाठी तो तेथेच लपून बसला असता, गाय एका ठिकाणी दूधाची धार सोडत असल्याचे त्याचा लक्षात आले. जवळ जाऊन पाहिले असता शिवलिंग त्याच्या दृष्टीस पडले. त्याने ती जागा स्वच्छ केली. शिवलिंग असलेल्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. श्री नागेश महारूद्र संस्थान नागेशी येथे स्वयंभू शिवलिंग पहावयास मिळते.

हेही वाचा