श्री शांतादुर्गा देवी फक्त कुंकळ्ळीवासीयांचेच नव्हे तर संबंध गोमंतकीयांचे श्रद्धास्थान आहे. ही देवी नवसाला पावणारी आहे. श्री शांतादुर्गा देवी दोन रूपात सामावलेली आहे. ही देवी ‘मागणे’ची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. भाविकांना ती आपल्यासाठी मागून घेते, अशी श्रद्धा आहे.

श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थान सासष्टी तालुक्यातील कुंकळ्ळी या समृद्ध पुण्यनगरीत होते. या देवीचे स्थलांतर कुंकळ्ळीहून केपे तालुक्यातील फातर्पा या निसर्गरम्य गावात झाले. आज देखील हा परिसर प्राचीन निसर्गरम्य परिस्थितीची साक्ष देतो.
कुंकळ्ळी ग्रामस्थांनी सोळाव्या शतकात पोर्तुगीज सत्तेविरुद्ध जो महान पराक्रम गाजवला, तेही ‘दुर्गेचेच एक रूप’ होते. ही दोन्ही रूपे श्री शांतादुर्गा देवीचीच. श्री शांतादुर्गा ही कुंकळ्ळीकरांची स्फूर्ती देवता आहे. या देवस्थानचा प्रमुख उत्सव म्हणजे वार्षिक जत्रोत्सव.
पहिल्या दिवशी सकाळी बारा गावकऱ्यांच्या सहभागाने श्रींस महाभिषेक होतो. त्यानंतर सायंकाळी दिवे लागणीवेळी परंपरेनुसार फातर्पा गावच्या देसाईला सन्मानाने आमंत्रित करुन त्यांचा बहुमान केला जातो. विधिपूर्वक नमन करुन उत्सवाला आरंभ होतो. रात्री श्री खंडेरायाच्या उत्सव मूर्तीची पालखीतून मिरवणूक निघते. त्यानंतर मळकर्णेच्या पेरणी लोकांचा धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजक ‘जागर’ कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवसापासून अनुक्रमे अंबारीतून, फुलांच्या रथातून, विजय रथातून व पाचव्या दिवशी श्री शांतादुर्गेची महारथातून मिरवणूक निघते. ही भव्य मिरवणूक मुख्य ठाण्यापासून आकार उद्गींच्या देवळाभोवती प्रदक्षिणा घालून मुख्य देवालयाच्या प्रदक्षिणेने ठराविक ठिकाणी मुक्काम करत मुख्य ठाण्यावर पोचते. तिथे रथोत्सवाची सांगता होते. मिरवणुकी दरम्यान शोभेच्या दारुकामाची आकर्षक आतषबाजी होते. पालखी किंवा रथ मिरवणूक निघण्यापूर्वी ‘उद्यो’ काढण्याची परंपरा आहे. मुख्य देवळातून उदेकार उद्यो खांद्यांवर घेऊन बारा गावकऱ्यांसह मिरवणूक निघते. तूप साखरेचा प्रसाद प्रथम बारा गावकऱ्यांना व भक्तगणांना दिला जातो. नंतर पालखी किंवा रथ मिरवणूक काढण्यात येते. या उत्सवाला गोव्यासह कारवार, बेळगाव, कोकण, मुंबई येथील भाविक दर्शनासाठी येतात. सहाव्या दिवशी उस्कीणीचा जागर होतो. कुंकळ्ळीचे महाजन, ग्रामस्थ, परिसरातील इतर लोक जत्रेत भरलेल्या फेरीचा आनंद लुटतात. जत्रेच्या दिवसांत उत्साही वातावरण पसरुन एक प्रकारचा आनंद उपभोगण्यास मिळतो. आप्त इष्ट, स्नेही, मित्र परिवाराची भेट आणि धार्मिक वातावरणात, मनःशांती मिळून सांसारिक क्लेश दूर होण्यास मदत होते.
अशा आनंददायी आणि उत्साही वातावरणात भाविकांना पुढच्या वर्षी येणाऱ्या जत्रेची ओढ लागलेली असते. दुसऱ्या दिवसापासून श्रींस अर्पण केलेले सोन्याचे दागिने, कपडे व इतर मौल्यवान वस्तूंचा लिलाव केला जातो. त्यामुळे देवीच्या भांडारात मोठी रक्कम जमा होते. त्यात देवस्थानच्या वर्षभराच्या खर्चाची तरतूद होत असते. देवीच्या मंगलमय आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने आनंदी वातावरणात या जत्रोत्सवाची सांगता होते.
ही देवी ‘मागणे’ची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. भाविकांना ती आपल्यासाठी मागून घेते, अशी श्रद्धा आहे. त्यासाठी कौल, प्रसाद अशा स्वरूपात खात्री केली जाते. त्यानंतर देवीने संबंधित भक्ताला ‘मागणे’ घातले आहे का हे बघितले जाते. तसे असेल तर मंदिरात देवीसमोर जाऊन तीर्थ सोडून सांगणे केले जाते. दरवर्षी ‘पड’ पोचविण्यासाठी त्या भक्ताला देवीच्या चरणी जावे लागते. असे हजारो भक्त गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात आहेत.