अश्लील वक्तव्ये आणि छेडछाडीचा आरोप

पणजी : गोव्यातील उत्तर गोव्यातील प्रसिद्ध मोरजी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची छेडछाड करणाऱ्या आणि अश्लील वर्तन करणाऱ्या एका युट्युबरविरुद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ‘GudduVlogs7’ या युट्युब आयडीचा वापर करणाऱ्या संशयिताने विदेशी आणि भारतीय पर्यटकांना त्रास दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित युट्युबरने मोरजी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या प्रायव्हसीत हस्तक्षेप करत त्यांना अडवून धरले. त्याने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण करून पर्यटकांना त्रास दिला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने महिला पर्यटकांना अयोग्य पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना उद्देशून अश्लील टिप्पणी करणे आणि त्यांच्या विनयशीलतेचा अपमान केल्याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
इतकेच नव्हे तर, संशयिताने आपल्या चॅनेलवर असे काही कंटेंट प्रसारित केले आहे, ज्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होऊन विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने चित्रित करणे आणि त्यांच्याशी गैरवर्तन करणे हे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला तडा देणारे कृत्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मांद्रे पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित डिजिटल मजकुराची आणि संशयिताच्या वर्तणुकीची सखोल चौकशी सुरू आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा छळ करणे किंवा प्रक्षोभक ऑनलाइन मजकूर तयार करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.