आग लावल्याचा संशय; भंगार अड्ड्यांना स्थानिकांचा विरोध

फोंडा : गोव्यातील (Goa) आशेवाडा-बेतोडा येथे नागरी वस्तीत (Residential area) असलेल्या भंगार अड्ड्याला (Scrap yard) पहाटे ३ वाजता भीषण आग लागली. अज्ञाताने आग (Fire) लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आग लागताच भंगार अड्ड्यात असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आगीने पेट घेतला व सर्वत्र पसरली. धुराने परिसर भरून गेला. त्यात भंगारअड्ड्या जवळील गोदामाकडे असलेला एक टेम्पोही जळाला. आग लागल्याची माहिती मिळताच फोंडा, कुंडई, मडगाव येथील अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब आणून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन दलाच्या एकूण १२ गाड्या वापरून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
आग लागलेला भंगार अड्डा हा नाजीर सिद्दीकी यांच्या मालकीचा असून, त्यांनी कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे. आपण नेहमी रात्री भंगार अड्ड्यातील विजेचा मुख्य स्वीच बंद करत असतो. त्यामुळे शॉर्टसर्कीट मुळे आग लागलेली नाही. मागच्या बाजूने येऊन कुणी तरी आग लावल्याचा संशय नाजीर यांनी व्यक्ती केला व सीसीटीव्हीची पाहणी करणार असल्याचे सांगितले. आग लागली तेव्हा आपण भंगार अड्ड्यातच होतो. मात्र, मागच्या बाजूला लागलेली आग वेगाने सर्वत्र पसरल्याचे त्यांनी सांगितले.
भंगारअड्ड्याला स्थानिकांचा विरोध
याठिकाणी नागरी वस्तीत बरेच भंगारअड्डे असून, त्यांना स्थानिकांचा विरोध आहे. यासंदर्भातील प्रश्न ग्रामसभेतही उपस्थित करण्यात आला होता. त्यातच आता आग लागण्याची घटना घडल्याने; भंगार अडड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचे पडसाद पुढील ग्रामसभेत उमटण्याचे व भंगार अड्ड्यांच्या प्रश्नावर बरीच खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.