उत्तर प्रदेशात मारामारीत काहीजण जखमी; पोलिसांनी थांबवले लग्न

फतेहपूर (उत्तर प्रदेश) : लग्न (Wedding) सोहळ्यासाठी दोन्ही बाजूचे कुटुंब एकत्र आले. काही विधीही पार पडले. मात्र, एवढ्यात वधूपक्षातील जवळच बांधून ठेवलेला कुत्रा भुंकल्याने सुरू झालेल्या भांडणाचे मारामारीत रुपांतर झाले. (Violent clash).
आणि ठरलेले लग्नच (Marriage) रद्द करण्याची घटना फतेहपूर, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे घडले. ‘लग्नात बारा विघ्ने’ याप्रमाणे हा एकूण प्रकार घडला. आणि आनंदाचे रुपांतर एका क्षणात तणावात झाले. मारामारीत काहीजण जखमी झाले. पोलिसांनी दाखल होऊन लग्न सोहळाच थांबवला.
फतेहपूर जिल्ह्यातील खागा कोतवाली परिसरातील एका गेस्ट हाऊस मध्ये ही घटना घडली. वधूपक्ष प्रयागराजहून बस व खासगी वाहनांद्वारे आला होता, तर वरपक्ष पारंपारिक मिरवणुकीसह दाखल झाला होता. सुरूवातीचे सर्व विधी शांततेत पार पडले. वर सुमित केसरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे काही काळापासून प्रेमसंबंध होते आणि त्यांनी यापूर्वी कानपूर येथील आर्य समाज मंदिरात पळून जाऊन विवाह केला होता. कुटुंबीयांमध्ये समेट झाल्यानंतर फतेहपूर येथे पारंपरिक पद्धतीने समारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र; गुरुवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास दागिन्यांच्या सादरीकरणाचा विधी सुरू असताना वधू पक्षाचा पाळीव कुत्रा, जो थोड्या अंतरावर बांधून ठेवला होता, सतत भुंकत होता. आवाजामुळे त्रस्त झालेल्या वरपक्षातील एका तरुणाने कुत्र्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे वधूपक्ष संतप्त झाला आणि दोन्ही बाजूंमध्ये वादाला सुरूवात झाली.
प्रत्यक्षदर्शींनुसार, वाद लवकरच हिंसक झाला. काठ्या व खुर्च्यांचा वापर करून मारामारी झाली. वधूपक्षातील शुभम गुप्ता, ऋषभ केसरवानी आणि संगीता देवी यांना डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. वरपक्षातील एक-दोन जणांनाही किरकोळ जखमा झाल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचताच पाहुण्यांमध्ये घबराट पसरली.
प्रकरण खागा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून लग्न सोहळा थांबवला. जखमींवर प्राथमिक उपचार केंद्रीय आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रयागराजला परत पाठविण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला असून; लग्न अखेर रद्द करण्यात आले.