गलगोटिया 'रोबोडॉग'प्रकरण; नेहा सिंग यांचे निलंबन नाही : विद्यापीठ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गलगोटिया 'रोबोडॉग'प्रकरण; नेहा सिंग यांचे निलंबन नाही : विद्यापीठ

नवी दिल्ली: नवी दिल्लीतील कृत्रिम प्रज्ञा प्रभाव (India AI impact Sumit 2026) परिषदेत चिनी बनावटीचे 'रोबोडॉग' प्रदर्शित करून स्वतःचे नावीन्यपूर्ण उत्पादन 'ओरायन' असल्याचे संबोधल्याने गलगोटिया विद्यापीठ चर्चेत आहे. याप्रकरणी विद्यापिठाच्या नेहा सिंग यांना निलंबित केल्याची चर्चा आहे. मात्र, गलगोटिया (Galgotias ) विद्यापीठातर्फे निलंबनाचा दावा फेटाळण्यात आला आहे. नेहा सिंग (Neha Singh ) यांना निलंबित करण्यात आले नाही तर प्रकरणाची तपासणी सुरू असल्याने; अजून  कारवाई करण्यात आली नसल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

'रोबोडॉग' प्रकरणामुळे विद्यापीठावर चौफेर टीका करण्यात आली होती. त्याचबरोबर भारताच्या 'एआय'मधील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले गेले. या दरम्यान विद्यापिठाच्या उत्कृष्टता केंद्राने 'ओरायन'ची ('रोबोडॉग') निर्मिती केल्याची माहिती गलगोटिया विद्यापीठाच्या नेहा सिंग यांनी दिली होती व नंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. 'उत्साहाच्या भरात बोलले'; 'माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला ' अशी केलेली सारवासारव ही प्रसिद्धी माध्यमांत गाजली होती. 

दरम्यान, विद्यापीठाचे रजिस्ट्रार नितीन कुमार गौर यांनी सांगितले की, विद्यापीठाने यासंदर्भात स्पष्टीकरण सादर केले असून, 'रोबोडॉग' प्रदर्शित करणे ही चूक होती. आणि विद्यापीठाने प्रदर्शनातून स्टॉल काढण्याचा निर्णय घेतला आहे. झालेल्या मनस्तापाबद्दल माफी मागत असल्याचे सांगितले व ही चूक कशी घडली त्याची माहिती घेण्यासाठी अंतर्गत आढावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 

आम्हाला विद्यापीठाची व देशाची प्रतिमा खराब झालेली नको आहे. ही स्थिती टाळणे शक्य होती. मात्र, यातून कुणाची दिशाभूल करण्याचा उद्देश नव्हता. यापुढे अशी चूक होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे गौर यांनी स्पष्ट केले.

नेहाला निलंबित केले नाही 

नेहा सिंग यांना निलंबित केल्याच्या अफवा असल्या तरी निलंबित करण्यात आले नसल्याचे रजिस्ट्रार गौर यांनी स्पष्ट केले. याप्रकरणाचा अजून तपास सुरू आहे व त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. गरज पडल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा