एसआयआर : किमान २४ मतदारसंघांच्या राजकीय समीकरणांवर होणार परिणाम

मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रत्येकी दोन हजारांहून अधिक मतदार घटले


6 mins ago
एसआयआर : किमान २४ मतदारसंघांच्या राजकीय समीकरणांवर होणार परिणाम

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मागील विधानसभा निवडणुकीच्या (२०२२) तुलनेत एसआयआर मोहिमेनंतर राज्यातील २४ मतदारसंघांत मतदारांची संख्या प्रत्येकी दोन हजारांहून अधिकने कमी झाली आहे. फक्त पर्ये मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघांत २०२२ च्या तुलनेत मतदारांची संख्या कमी झाली. मात्र वास्को, मुरगाव, दाबोळीसह २४ मतदारसंघांत मतदारांची संख्या कमी होण्याचे प्रमाण दोन हजारांहून अधिक आहे. ही बाब विद्यमान आमदारांना धोक्याची ठरू शकते. तसेच एकंदर राजकीय समीकरणे बदलण्यालाही कारण ठरू शकते.
निवडणूक आयोगाने बऱ्याच वर्षांनंतर यंदा मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम राज्यात पूर्ण केली. गोव्यासह अन्य राज्यांतही ही मोहीम पार पडली. या मोहिमेनंतर राज्यातील १,३९,६३४ मतदारांची नावे नवीन मतदार यादीतून बाहेर पडली आहेत. दरवर्षी मतदारांची संख्या वाढत असते; मात्र एसआयआर मोहिमेनंतर मतदारांची संख्या कमी झाली. २०२२ ची निवडणूक झाली, तेव्हा उत्तर गोव्यात ५,४२,२६९ आणि दक्षिण गोव्यात ६,२१,२५५ मतदार होते. पूर्ण गोव्यात एकूण ११,६४,२२४ मतदार होते. एसआयआर मोहिमेनंतर राज्यात १०,५७,५६६ मतदार राहिले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत फक्त पर्ये मतदारसंघातच मतदारांची संख्या ३३१ ने वाढली आहे.
वास्कोत दहा हजारांहून अधिक मतदार घटले
वास्को मतदारसंघात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी ३५,५५२ मतदार होते. आता मतदारांची संख्या २४,७४३ झाली आहे. वास्को मतदारसंघात एसआयआर मोहिमेनंतर आता १०,८०९ मतदार कमी झाले आहेत. त्यामुळे वास्को मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील. याशिवाय कुठ्ठाळी (७,१४०), मुरगाव (४,०३४), फोंडा (४,२३०), फातोर्डा (३,८९३), नावेली (३,५७३), मडगाव (३,५०५), पणजी (४,३३७), ताळगाव (४,२६९), सांताक्रूझ (४,१८५), सांत आंद्रे (३,१८४), कळंगुट (३,२४५), साळगाव (३,१७२), म्हापसा (३,६४२) या मतदारसंघांतील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
दोन हजारांहून अधिक मतदार कमी झालेले मतदारसंघ
उत्तर गोवा : थिवी, म्हापसा, शिवोली, साळगाव, कळंगुट, पर्वरी, हळदोणा, पणजी, ताळगाव, सांताक्रूझ, सांत आंद्रे, कुंभारजुवा.
दक्षिण गोवा : फोंडा, मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी, नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी.