ग्रामसभेत ठराव : भरमसाट घरपट्टी कमी करण्याचाही निर्णय

फोंडा : उसगाव पंचायत क्षेत्रातील बदलण्यात आलेले घर क्रमांक दुरुस्त करून पुन्हा जुने क्रमांक देणे, वाढीव घरपट्टीत कपात करणे तसेच स्थानिकांच्या भविष्यासाठी कोमुनिदादकडून ५ लाख चौरस मीटर जागा मिळविण्याचा ठराव रविवारी झालेल्या उसगाव ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला.
ग्रामसभा सरपंच प्रकाश उर्फ संजय गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पंचायत क्षेत्रातील अनेक घरांचे जुने क्रमांक बदलून नवीन क्रमांक देण्यात आल्याने नागरिकांच्या आधार कार्ड, रेशन कार्ड व इतर कागदपत्रांमध्ये विसंगती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांमध्ये अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पंचायत मंडळाने पुढाकार घेऊन घरमालकांना पुन्हा जुने घर क्रमांक देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
घरपट्टीत झालेल्या मोठ्या वाढीबाबतही ग्रामसभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पूर्वी २०० ते ३०० रुपये घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना सध्या ३ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरावी लागत असल्याने सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. लोकहिताचा विचार करून वाढीव घरपट्टीत कपात करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
तसेच कोमुनिदाद समितीने यापूर्वी विविधांना जमीन विक्री केल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या भावी पिढ्यांसाठी पंचायतीने ५ लाख चौरस मीटर जागा मिळवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासोबतच गावासाठी स्वतंत्र मैदानाची जागा कोमुनिदादकडून घेण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला.
सरपंच गावडे यांनी सांगितले की, घरपट्टी कपातीसंदर्भातील ठराव संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल. तसेच बदललेल्या घर क्रमांकांची तपासणी करून योग्य निर्णय घेतला जाईल. पंचायत क्षेत्रातील भावी गरजांचा विचार करून कोमुनिदादकडून जागा मिळवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गरीब विधवा, ज्येष्ठ महिलांना दिलासा
उसगाव पंचायत क्षेत्रातील गरीब विधवा तसेच आधार नसलेल्या वृद्ध महिलांकडून जुनीच घरपट्टी आकारण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे गरजू महिलांना निश्चितच दिलासा मिळणार असल्याचे सरपंच प्रकाश उर्फ संजय गावडे यांनी सांगितले.