केंद्रीय मंत्री चिराग पासवान : कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर समुद्र महाआरती, संत-महंतांची उपस्थिती

कळंगुट : आपल्या भावी पिढीला अध्यात्माचा, संस्कृतीचा परिचय देणे आवश्यक आहे. साधूसंतांबरोबर आपली संस्कृती पुढे घेऊन जाणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. यापुढे गोव्यात येताना आध्यात्मिकता अनुभवण्यासाठी या आणि गोव्यातील पुरातन मंदिरांचेही दर्शन घ्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी केले.
विश्वस्तरावर गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना केवळ पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र म्हणून ओळख मिळावी, या उद्देशाने आयोजित गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल २०२६ अंतर्गत समुद्र आरती सोहळा कळंगुट समुद्र किनाऱ्यावर भव्य स्वरूपात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
गोव्याची भोगभूमी नाही तर योगभूमी, आध्यात्मिक भूमी म्हणून ओळख व्हावी यासाठी ब्रह्मेशानंद स्वामी प्रयत्न करीत आहेत. त्यांची प्रशंसा करण्यासाठी शब्द अपुरे आहेत, असे अखिल भारतीय अाखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी स्वामी म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री शांतादुर्गा मंदिरात महापूजनाने झाली. ढोलताशांच्या नादात, जयघोषात, हरिनामाच्या गजरात संत-महंतांच्या सान्निध्यात भव्य शोभायात्रा झाली.
ब्रह्मेशानंद स्वामींचा ‘गोवा स्वामी’ नामकरणाद्वारे गौरव
संत पूजन, समुद्र महाआरती, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचा गौरव, आशीर्वचन तसेच संत-महंतांच्या हस्ते ब्रह्मेशानंद स्वामींचा ‘गोवा स्वामी’ या नामकरणाद्वारे भव्य गौरव झाला. हजारोंच्या संख्येने भाविक-श्रद्धाळू यावेळी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर शंकराचार्य स्वामी श्री ज्ञानानंद तीर्थ, महंत रवींद्रपुरी स्वामी, श्री ज्ञानेश्वरदेवाचार्यजी महाराज, स्वामी धर्मदेव महाराज, श्री जनार्दन हरि स्वामी, स्वामी सम्पूर्णानन्द ब्रह्मचारी, गोस्वामी सुशिल महाराज, नारायणानन्द गिरि, डॉ. राजराजेश्वर गुरुजी, महामण्डलेश्वर स्वामी आषुतोषानंद, अनंतबोध चैतन्य स्वामी, राधे राधे बाबाजी, भूपेन्द्रगिरी, गोपाल चैतन्य, स्वामी अनन्तानंद, निरंजन स्वामी आदी उपस्थित होते.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार मायकल लोबो, कृष्णा साळकर, प्रवीण आर्लेकर आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.
गोव्यात योग शिकण्यासाठी या : ब्रह्मेशानंद स्वामी
गोव्यात योग, संस्कृती शिकण्यासाठी या. गोव्याची संस्कृती अतिथी देवो भव आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण जाणार तेथे आवर्जून आपल्या शिष्यांसमोर गोव्याची ही खरी ओळख ठेवा, असे आवाहन ब्रह्मेशानंद स्वामींनी संत महंतांना केले.