पेडणेतील थोरलेबाग टेकडीवर सलग दुसऱ्या दिवशी आग

पायथ्याशी राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
पेडणेतील थोरलेबाग टेकडीवर सलग दुसऱ्या दिवशी आग

पेडणे : गोव्यातील (Goa) पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) केरी परिसरातील थोरलेबाग येथील टेकडीवर सलग दुसऱ्या दिवशी आग (Fire) लागण्याची घटना घडली. त्यामुळे टेकडीच्या (Hilltop) पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालही टेकडीवर आग लागली होती आणि आज पुन्हा त्याच ठिकाणी आग व धुराचे लोट दिसू लागल्याने नागरिकांनी तत्काळ संबंधित यंत्रणांना कळवले. मात्र, काल व आज तक्रार करूनही ग्रामपंचायत तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

टेकडीच्या खाली अनेक घरे, वस्ती असून, आग वेगाने पसरल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. कोरड्या गवतामुळे आणि वाढत्या तापमानामुळे आग आणखी भडकण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. 

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.