
पणजी : गेल्या ६ डिसेंबर रोजी २५ जणांचा बळी घेतलेल्या हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबातील अग्नितांडवची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात न्यायालयाने क्लबचे मालक सुरेंद्र कुमार खोसला यांच्या पत्नीला प्रतिवादी केले असून त्यांना नोटीस जारी केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ मार्च रोजी ठेवली आहे.
हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. या संदर्भात मंगळवारी सुनावणी झाली असता, बर्च क्लबची मालमत्ता पाडण्याच्या पंचायत संचालनालयाच्या आदेशाला मालक सुरेंद्र कुमार खोसला याच्या पत्नीने म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिल्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. त्यानुसार, तिला प्रतिवादी करण्याची मागणी न्यायालयात केली. याची दखल घेऊन न्यायालयाने तिला नोटीस जारी करून पुढील सुनावणी २३ मार्च रोजी ठेवली आहे.
२५ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता पाडण्याच्या आदेशाला स्थगिती
हडफडे येथील आग दुर्घटनेला कारणीभूत बर्च क्लबची मालमत्ता पाडण्याच्या आदेश पंचायत संचालनालयाने दिला होता. या आदेशाला क्लबचे मालक सुरेंद्र कुमार खोसला यांच्यातर्फे पत्नीने म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने २५ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ता पाडण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.