राज्यातील न्यायालयांद्वारे खटले निकाली काढण्याच्या संख्येत वाढ

२०२५ मध्ये १५ हजार १३ खटले निकाली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
1 hours ago
राज्यातील न्यायालयांद्वारे खटले निकाली काढण्याच्या संख्येत वाढ

पणजी : मागील काही वर्षांत राज्यातील विविध न्यायालयांतील प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत आहे. असे असले तरी न्यायालयांद्वारे खटले निकाली काढण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. २०२३ मध्ये न्यायालयांद्वारे २,७६१ खटले निकाली काढण्यात आले होते. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ६,१९५ झाली. तर २०२५ मध्ये १५ हजार १३ खटले निकाली काढण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील विविध दिवाणी, फौजदारी, सत्र, जिल्हा न्यायालयांचा समावेश आहे.

केंद्रीय कायदा खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये निकाली काढण्यात आलेल्या एकूण खटल्यांपैकी १० हजार ७८१ उत्तर गोवा तर ४ हजार २३२ दक्षिण गोव्यातील होते. एकूण खटल्यांपैकी ३,०५३ दिवाणी तर ११ हजार ९६० फौजदारी खटले होते. राज्यात १९६६ पासून ते २०२५ पर्यंत एकूण ३२ हजार २६० खटले निकाली लावण्यात आले आहेत. यातील १८ हजार ९७४ खटले (५९ टक्के) हे एका वर्षात निकाली काढले आहेत. तर, ३,८८४ (१२.०४ टक्के) १ ते २ वर्षात निकाली काढण्यात आले आहेत.

वरील कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या एकूण खटल्यांपैकी १,९९३ (६.१८ टक्के) हे २ ते ३ वर्षे, १८४३ (५.७१ टक्के) हे ३ ते ४ वर्षे, १५३६ (४.७६ टक्के) ४ ते ५ वर्षात निकाली लावण्यात आले आहेत. ३७८८ खटले निकाली काढण्यास ५ ते १५ वर्षे, १०६ खटले निकाली काढण्यास १५ ते २० वर्षे कालावधी लागला. ७ खटले निकाली काढण्यात २० ते २१ वर्षांचा कालावधी लागला. तर ८२ खटले निकाली काढण्यास २१ वर्षांहून अधिक कालावधी लागला होता.