सभापतींनीही घेतली भेट कलम ‘३९ अ’ रद्द होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार

प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ अ रद्द होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आमदार वीरेश बोरकर यांनी जाहीर केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आझाद मैदानात येऊन आमदार बोरकर यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते; मात्र कलम ३९ अ रद्द होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्णय वीरेश बोरकर यांनी जाहीर केल्याने आझाद मैदानातील आंदोलन सुरूच राहणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री आझाद मैदानावर येऊन आमदार वीरेश बोरकार यांची भेट घेतली. नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ अ रद्द करणे वा अन्य मागण्या विधानसभेत मांडाव्यात. विधानसभेत मागण्यांवर चर्चा होईल. सध्या उपोषण मागे घ्यावे, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार बोरकर यांना दिला. यानंतर काँग्रेसचे विधीमंडळ नेते युरी आलेमाव, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस, आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी चर्चा केली. यानंतर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय आमदार वीरेश बोरकर यांनी जाहीर केला.
नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ अ रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला पाहिजे. कलम ३९ अ खाली मंजूर झालेले प्रस्ताव रद्द केले जातील, असे प्रतिज्ञापत्र अॅडव्होकेट जनरलानी न्यायालयात सादर करावे. त्यानंतर सरकारने ३९ अ कलम रद्द करणारे दुरुस्ती विधेयक सभागृहात मंजूर करावे, नगर नियोजन कार्यालयातून माझ्यासह आंदोलकांना बाहेर काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, सांत आंद्रे मतदारसंघात कलम ३९ अ खाली जमीन रूपांतरणाचे चार प्रस्ताव मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणी वीरेश बोरकर यांनी केली.
पत्रकार परिषदेला आरजीचे प्रमुख मनोज परब, युरी आलेमाव, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठक बोलावून कलम ३९ अ रद्द करण्याचा निर्णय घेणे सरकारला सहज शक्य आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले. सरकारने मंत्रिमंडळ बैठक बोलवावी आणि निर्णय घ्यावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वा. आमदार वीरेश बोरकर आणि तुषार गावस आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी आमरण उपोषण आरंभले. आमदार बोरकर आणि गावस यांना सोमवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन सोमवारी उग्र झाले. सोमवारी सायंकाळी दोनापावला येथील मंत्री विश्वजीत राणे यांच्या खासगी बंगल्यासमोर आंदोलकांनी ठिय्या मारला होता. रात्री उशिरा वीरेश बोरकर यांची तब्येत खालावल्याने आंदोलक पुन्हा आझाद मैदानात परत आले होते. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वीरेश बोरकर यांनी उपोषण मागे घ्यावे : मुख्यमंत्री
आमदार वीरेश बोरकर यांच्या प्रकृतीची काळजी वाटल्याने मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यावर विधानसभेत चर्चा करावी. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असा सल्ला मी त्यांना दिला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
