कलम ३९ (अ) विरोधातील आंदोलन उग्र

मंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावल येथील बंगल्यासमोर आंदोलकांचा ठिय्या : रस्ते ठप्प झाल्यामुळे स्थानिक, पर्यटकांची गैरसोय : वीरेश यांची प्रकृती खालावल्याने रात्री उशिरा इस्पितळात केले दाखल


34 mins ago
कलम ३९ (अ) विरोधातील आंदोलन उग्र

दोनापवल येथील मंत्री विश्वजीत राणे यांच्या निवासस्थानासमोर ‌निदर्शने करताना आंदोलक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नगर नियोजनाशी संबंधित वादग्रस्त कलम ३९ (अ) विरोधात आणि आमदार वीरेश बोरकर यांना न्याय मिळावा या मागणीसाठी छेडण्यात आलेले महाआंदोलन सोमवारी उग्र झाले. पोलिसांचा बंदोबस्त भेदून शेकडो आंदोलकांनी नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावल येथील खासगी बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे दोनापावल परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. मागण्या पूर्ण होईपर्यंत रस्त्यावरच ठिय्या देण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. वीरेश यांची प्रकृती खालावल्याने आंदोलक पुन्हा आझाद मैदानात आले. रात्री उशिरा वीरेश बोरकर यांना वैद्यकीय उपचारासाठी इस्पितळात दाखल केले.


वादग्रस्त कलम ३९ (अ) रद्द करा आणि आमदार वीरेश बोरकर यांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, या प्रमुख मागण्यांसाठी आझाद मैदानावर तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सोमवारी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. सभेनंतर आंदोलकांनी मंत्री राणे यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवण्याचा निर्णय घेतला.


विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार व्हेंझी व्हिएगस, कार्लुस फेरेरा आणि आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी मोर्चा काढला. पोलिसांनी तो अनेक ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी मार्ग बदलत, पायवाटांद्वारे मंत्री राणेंच्या बंगल्यासमोर पोहोचण्यात यश मिळवले. काही आंदोलक मात्र मंत्र्यांच्या दुसऱ्या बंगल्याकडे गेल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.


आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली
आंदोलनामुळे पोलिसांनी दोनापावल–बांबोळी मार्गावरील दोन्ही बाजूंचे रस्ते बंद केले होते. त्यामुळे ताळगाव, करंझाळे परिसरातील नागरिक व पर्यटक यांची गैरसोय झाली. मागण्या मान्य होईपर्यंत रात्रभर ठिय्या आंदोलनाचा निर्धार आंदोलकांनी केला. आंदोलनस्थली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
शांततेच्या मार्गानेच आंदोलन राहणार सुरू
आंदोलकांनी मंत्र्यांच्या बंगल्यासमोरील मुख्य मार्ग रोखून घोषणाबाजी सुरू ठेवली. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा इशाराही दिला. दरम्यान, आयोजकांनी आंदोलन शांततेच्या मार्गानेच करण्याचे आवाहन केले. ‘आम्ही कायदा हातात न घेता अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. कोणतीही आक्रमक कृती न करता रात्रभर येथेच ठिय्या देऊ’, असे आरजीपीचे नेते अजय खोलकर यांनी सांगितले. आंदोलकांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी स्पष्ट केले.


विजय सरदेसाई आझाद मैदानातूनच बाहेर

मंत्री राणे यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे जाहीर झाल्यानंतर गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आझाद मैदानातूनच काढता पाय घेतला. विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले की, चळवळी जबाबदारीने चालवल्या गेल्या पाहिजेत. शिस्त आणि सुरक्षितता महत्त्वाची असते. चळवळीला मी पाठिंबा देतो. मात्र, कोणाच्या खासगी निवासस्थानी मोर्चा नेण्यास समर्थन देऊ शकत नाही. लोकशाही ही दडपशाहीत रूपांतरित होऊ नये.

आंदोलकांच्या बस रोखल्याचा आरोप
या आंदोलनासाठी राज्यभरातून येणाऱ्या ११ बस पोलिसांनी अडवल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विरोधी आमदारांच्या हस्तक्षेपानंतर या बस सोडण्यात आल्या.


वीरेश बोरकर यांची प्रकृती खालावली

आमदार वीरेश बोरकर यांनी आझाद मैदानावर सुरू केलेले उपोषण सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होते. अन्न व पाण्याशिवाय उपोषण सुरू ठेवल्याने त्यांची प्रकृती खालावली. ते मैदानावरच विश्रांती घेत आहेत. रात्री डॉ. आॅस्कर रिबेलो यांनी त्यांची तपासणी केली. वीरेश यांची प्रकृती खालावल्याने दोनापावल येथे गेलेले आंदोलक पुन्हा आझाद मैदानावर दाखल झाले. रात्री उशिरा वीरेश बोरकर यांना वैद्यकीय उपचारासाठी इस्पितळात दाखल केले.