दोघे जखमी : जखमींत चार महिन्यांच्या बालिकेचा समावेश

म्हापसा : आसगाव येथील हॅप्पीबार जंक्नशनवर भरधाव रेन्ट अ कॅब थार जीपने आयटेन कारला धडक दिल्याने झालेल्या अपघात भगत राम शर्मा (६५, रा. भोपाळ) यांचा मृत्यू झाला. तर मयताची पत्नी लीला शर्मा व चार महिन्यांची नात जखमी झाली आहे.
हा अपघात सोमवारी २३ रोजी सांयकाळी ३.३० वा. च्या सुमारास घडला. अपघातग्रस्त जीए ०३ व्ही ५६९५ क्रमांकाची रेन्ट अ कॅब थार जीप घेऊन शौर्य गोयल (१९, रा. दक्षिण दिल्ली) हा आपल्या चार मैत्रणींसोबत हणजूणहून म्हापसाच्या दिशेने जात होता. तर तुषार पूनिहाल (रा. दिल्ली) हे जीए ०८ एबी ६६८५ क्रमांकाची आय ट्वेंटी कार गाडी घेऊन पत्नी मुलगी, सासू, सासरा व मेहुणा यांच्यासमवेत आसगावहून पर्राच्या दिशेने जात होता.
घटनास्थळी जंक्नशनवर भरधाव थार जीपने आय ट्वेंटी गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेबरोबर गाडीच्या डाव्या बाजूच्या शीटवर बसलेले भगत शर्मा त्यांची पत्नी लीला शर्मा यांच्यासह गाडीतील ४ महिन्यांची बालिका ही गंभीर जखमी झाली. कार चालक व त्यांना रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी भगत राम शर्मा यांना मृत घोषित केले. तर जखमींवर उपचार सुरू आहेत. थार जीपचा चालक आणि इतर प्रवासीही किरकोळ जखमी झाले.
या अपघातामुळे आसगाव हणजूण व आसगाव पर्रा मार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली. हणजूण पोलिसांनी दोन्ही वाहनांना हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघातास कारणीभूत थार जीप चालक शौर्य गोयल याच्याविरूद्ध हणजूण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र राऊळ यांनी तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक साईश किनळेकर हे पुढील तपास पोलीस करत आहेत.
युवती चालवत होती थार
प्रत्यक्षदर्शींकडून मिळाल्या माहितीनुसार अपघातग्रस्त थार जीप ही एक युवती चालवत होती. तर अपघातानंतर गाडीतील युवक हा चालकाच्या सीटवर बसला व त्याने आपण गाडी चालवत असल्याचे भासवले.