कलम '३९ ए' विरोधात आंदोलकांचा विश्वजीत राणेंच्या बंगल्यावर धडक मोर्चा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
कलम '३९ ए' विरोधात आंदोलकांचा विश्वजीत राणेंच्या बंगल्यावर धडक मोर्चा

पणजी : नगरनियोजन कायद्याचे (TCP Act) वादग्रस्त कलम '३९ ए' रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर जमलेल्या आंदोलकांनी आता आपला मोर्चा थेट नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या दोना पावला येथील निवासस्थानाकडे वळवला आहे. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी त्यांना न जुमानता आपला मोर्चा सुरूच ठेवला.



लढ्याचा चौथा दिवस 

पाळे-शिरदोन येथील जमिनीचे झोन बदल रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेले हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. या लढ्याला विरोधी पक्षांसह भंडारी समाजानेही जाहीर पाठिंबा दिला आहे. सोमवारी सायंकाळी आझाद मैदानावर विरोधी पक्षांचे आमदार आणि हजारो आंदोलक एकत्र जमले होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर सर्वांनी मिळून नगरनियोजन मंत्र्यांच्या बंगल्यावर धडक देण्याचा निर्णय घेतला.



दरम्यान, आंदोलकांना आझाद मैदानापर्यंत पोहोचू न देण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी त्यांच्या बस अडवल्याचा गंभीर आरोपही विरोधी आमदारांनी केला आहे. या अडथळ्यांनंतरही आंदोलकांनी आपला निर्धार कायम ठेवत मंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने कूच केली आहे.

हेही वाचा