१५ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे पंचायत प्रशासनाचे आश्वासन

पणजी : पंचायत राज कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आणि कारभारात अकार्यक्षमता दाखवल्याचा आरोप करत चिंबल येथील ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत कार्यालयावर जोरदार दिली. गट विकास अधिकाऱ्यांनी (BDO) स्पष्ट आदेश देऊनही पंचायतीने अनिवार्य ग्रामसभा आयोजित न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या दिरंगाईविरोधात ग्रामस्थांनी पंचायत कार्यालयाबाहेर निदर्शने करत प्रशासनाला जाब विचारला आणि पारदर्शक कारभाराची मागणी केली.
यावेळी सरपंच शिरोडकर यांना पंचायतीत जण्यापासून रोखून धरत आतापर्यंत ग्रामसभा का घेतली नाही याचा जाब ग्रामस्थांनी विचारला. ग्रामस्थांच्या या वाढत्या दबावामुळे अखेर पंचायत प्रशासनाने नमते घेत येत्या १५ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे मान्य केले आहे. मात्र, ही सभा बंद खोलीत न घेता खुल्या जागेत घ्यावी, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता येईल आणि सभेचे कामकाज पारदर्शक राहील, अशी आग्रही अट ग्रामस्थांनी घातली आहे. पंचायतीच्या प्रत्येक हालचालीवर आमचे बारीक लक्ष असून, यापुढे कायद्यानुसारच कामकाज व्हावे, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.