
पणजी : आज 'आमी पणजेकार' पॅनेलतर्फे काही जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत; उर्वरित उमेदवार उद्या अर्ज भरतील. आम्ही एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहोत. शहरात कॅसिनोमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यास आम्ही प्राधान्य देऊ. पणजीकरांना बदल हवा आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत आमच्या पॅनेलला मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केला. सोमवारी त्यांच्या पॅनेलतर्फे चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उत्पल पर्रीकर पुढे म्हणाले की, कॅसिनोमुळे पणजीकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शहरातील मूलभूत सुविधांवर मोठा ताण येत आहे. यामुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. सरकारने पणजीसाठी विशेष निधी दिला पाहिजे. तसेच, पार्किंगमध्ये काही जागा स्थानिकांसाठी आरक्षित असायला हव्यात. पे-पार्किंगमधून मिळणाऱ्या महसुलातून शहरात नवीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असेल.

आम्ही आमच्या पॅनेलच्या उमेदवारांची संपूर्ण यादी लवकरच जाहीर करू. दोन ठिकाणी आम्ही अपक्ष लढणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. पक्ष किंवा विचारसरणीपेक्षा 'उमेदवार पणजीसाठी योग्य आहे का?' याचा विचार करून आम्ही निवड केली आहे. पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त पणजी हे आमचे मुख्य ध्येय आहे. आमच्या पॅनेलमध्ये तरुण आणि अनुभवी अशा दोन्ही पिढ्यांचा संगम आहे. पणजीच्या हितासाठी आम्ही १० मुख्य मुद्दे निश्चित केले असून, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनाच उमेदवारी दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोमवारी २२ अर्ज दाखल
सोमवारी एकूण २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये 'आमी पणजेकार' पॅनेलच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ६ मधून डॉ. शीतल नाईक, प्रभाग क्रमांक १० मधून ॲड. विष्णू नाईक, प्रभाग क्रमांक १२ मधून शबनम खान, प्रभाग क्रमांक १३ मधून नरेश चारी, प्रभाग क्रमांक १६ मधून प्रांजल नाईक आणि प्रभाग क्रमांक ७ मधून लिओनिड फुर्तादो यांनी अर्ज भरले आहेत. याशिवाय, प्रभाग ४ मधून जॉन पो यांनी आपला अर्ज दाखल केला असून, त्यांची थेट लढत महापौर रोहित मोन्सेरात यांच्याशी होणार आहे; जॉन पो यांना 'आमी पणजेकार'ने पाठिंबा जाहीर केला आहे.