३ ठिकाणी ३ आंदोलने; तर चिंबलमध्ये ग्रामसभेसाठी रणकंदन.

पणजी: गोव्यात सोमवारी लोकभावनेचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला असून, विविध ज्वलंत प्रश्नांवरून एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी भव्य आंदोलने करण्यात येत आहेत. जुवारी नदीवरील प्रस्तावित बंधारा, कोळसा हाताळणीसाठीची प्रस्तावित जेटी, वादग्रस्त कलम ‘३९ ए’ आणि ग्रामसभा घेण्यात झालेला विलंब या मुद्द्यांवरून गोव्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. विशेषतः पणजी आणि सावर्डे परिसरात या आंदोलनांची तीव्रता अधिक दिसून आली.
मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याला ग्रामस्थांचा विरोध, दिली पंचायतीत धडक
मिराबाग-सावर्डे येथील जुवारी नदीवर प्रस्तावित असलेल्या बंधारा प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होऊन स्थानिकांच्या उपजीविकेवर गदा येईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी सावर्डे ग्रामपंचायतीवर धडक देत पंचायत कार्यालयाला घेराव घातला. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घ्यावे आणि प्रकल्पात पारदर्शकता असावी, असा इशारा यावेळी देण्यात आला. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी, ग्रामस्थांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

कोळसा हाताळणीसाठीच्या जेटीला तीव्र विरोध
दुसरीकडे, शेळवण-होडार येथे प्रस्तावित असलेल्या 'मल्टीबर्थ कार्गो जेटी' विरोधात असोल्डाचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ही जेटी केवळ कोळसा हाताळणीसाठीच बांधली जात असल्याचा आरोप करत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली पणजीतील पर्यावरण खात्याच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या प्रकल्पासाठी सरकार ठराविक कंत्राटदारांना का संरक्षण देत आहे, असा सवाल पाटकरांनी उपस्थित केला आहे. बाळकृष्ण होडारकर यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, पूर्वसूचना देऊनही प्रशासन मौन बाळगून आहे, ज्याचे गंभीर परिणाम भविष्यातील पिढीला सोसावे लागतील.
आंदोलनादरम्यान अमित पाटकर आणि निलेश काब्राल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. भाजप सरकार स्वतःच्याच आमदारांचे ऐकत नसल्याचा आरोप करत पाटकरांनी मुख्यमंत्र्यांना फोन करण्याची मागणी काब्राल यांच्याकडे यावेळी केली.
कलम ‘३९ ए’ विरोधात विरोधकांची वज्रमूठ
पणजीतील आझाद मैदानावर जमिनीचे रूपांतरण करणाऱ्या वादग्रस्त कलम ‘३९ ए’ विरोधात महाआंदोलन पुकारण्यात आले आहे. पाळे-शिरदोन येथील झोन बदल मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला आता राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे विधीमंडळ नेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, मनोज परब, व्हेंझी व्हिएगस आणि इतर विरोधी नेत्यांनी प्रत्यक्ष येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हे लोकविरोधी कलम रद्द होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार विरोधकांनी व्यक्त केला असून, आजच्या महाआंदोलनात हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. आमदार वीरेश बोरकर यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. आज २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पुन्हा हे आंदोलन पेटणार आहे.

चिंबलमध्ये ग्रामसभेसाठी रणकंदन
दरम्यान, चिंबल गावातही ग्रामसभा घेण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला. पंचायत राज कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत कार्यालयाबाहेर निदर्शने केली. गट विकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) सूचनेनंतरही ग्रामसभा का घेतली जात नाही, असा जाब विचारत महिलांनी सरपंचांना धारेवर धरले. अखेर ग्रामस्थांच्या दबावामुळे १५ मार्च रोजी ग्रामसभा घेण्याचे आश्वासन पंचायतीने दिले आहे. गोव्यातील या सर्व घडामोडींवरून जनता आता आपल्या हक्कांसाठी अधिक जागृत झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
