नार्वे गावच्या कोको देवाची जत्रा

नार्वे गावामध्ये साजरा होणारा गोमंतकातील एकमेव उत्सव म्हणजे ‘व्हडल्या देवाची मिरवणूक’. या देवाला ‘कोको देव’ असेही म्हटले जाते. देवाच्या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे जत्रा दरवर्षी ठराविक तिथीला साजरी न होता देवाच्या इच्छेनुसार साजरी होत असते.

Story: जत्रा |
22nd February, 09:44 pm
नार्वे गावच्या  कोको देवाची जत्रा

अपरांत ही देवदेवतांची भूमी. येथील लोक अतिशय श्रद्धाळू व संस्कृती जपणारे. रूढी-परंपरांचे पालन करून त्या पुढील पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी झटणारे. ऐक्य, धार्मिक श्रद्धा राखून ठेवण्याचे प्रमुख माध्यम म्हणजे मंदिर. गावोगावी असलेल्या या धार्मिक स्थळांमध्ये वर्षातून एकदा तरी ठरलेल्या तिथीला उत्सव साजरा करून आपला बंधुभाव, एकता, श्रद्धा टिकून ठेवण्यासाठी ते झटत असतात. नार्वे गावातील ‘थोरल्या देवा’ची मिरवणूक मात्र याला अपवाद म्हणावी लागेल. कारण या देवाची जत्रा देवाच्या इच्छेनुसार साजरी केली जाते.

नार्वे गाव तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीवर अनेक मंदिरे पहावयास मिळतात. याच गावामध्ये साजरा होणारा गोमंतकातील एकमेव उत्सव म्हणजे ‘व्हडल्या देवाची मिरवणूक’. या देवाला ‘कोको देव’ असेही म्हटले जाते.

कोको देवाची जत्रा दरवर्षी ठराविक तिथिला साजरी न होता देवाच्या इच्छेनुसार साजरी होत असते. देवांना ज्यावेळी मंदिरातून बाहेर पडण्याची इच्छा होते, त्याच वेळी देव ग्रामस्थांना बाहेर पडण्याचे संकेत देतो. यावेळी तेथील ग्रामस्थ देवाचा कौल घेऊन ही मिरवणूक कधी काढायची ते ठरवतात. तीन, पाच, सात, नऊ, बारा वर्षांनी हा योग येतो, असे सांगण्यात येते. पारंपरिकरीत्या चालत आलेला, शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवाची श्री देवी कणकेश्वरी मंदिरातून सुरुवात होते. थोरला देव म्हणजे रामरूपी ध्वज. फुलांनी सुशोभित केलेल्या ध्वजावर श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, भरत यांची चित्रे सोन्या-चांदीच्या धाग्याने रेखाटलेली आहेत. एका आख्यायिकेनुसार, दिवाडी बेटावर हा ध्वज एका रेंदेराला सापडला होता. त्याने तो एका धोब्याकडे सुपूर्द केला. धोब्याने तो नार्वे गावात आणला. यास्तव देवाची मिरवणूक तारीवर पोहोचल्यावर देव पैलतीरावर आपल्या आद्य स्थानाकडे जाण्यासाठी धाव घेतो. यावेळी देवावर तीर्थ मारून आंघोळ घालून त्याला अडविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. विघ्नहर्त्या गणेशाला जास्वंदी, लक्ष्मीदेवीला कमळाचे फूल त्याचप्रमाणे थोरल्या देवाला रतन अबोलीची फुले अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे देवाचा ध्वज सजविण्याकरता रतन अबोलीची फुले वापरण्याची प्रथा आहे. मिरवणुकीच्या दिवशी सकाळी पाच ठिकाणच्या मंदिरातून कोनाटी, मुर्डी, हिंदळेवाडा, देऊळवाडा, मधलावाडा या पाचही वाड्यांवरील फुलांची भेट देवाला पाठवली जाते. आंब्याचे पाच डहाळे, दोन नारळ व फुले भरून भरजरी कापडाने बंद केलेली टोपली, अबोली, झेंडूच्या फुलांनी सजवून कळसरूपाने वाजतगाजत श्री कणकेश्वरीच्या मंदिराकडे प्रयाण करते. पुढे हातात बेतकाठी घेऊन धोंड नाचत असतात. रस्ता माणसांनी भरून गेलेला असतो. ठिकठिकाणी विजेची रोषणाई, आकर्षक रांगोळ्या, गुढ्या-तोरणे उभारून सारा नार्वे गाव सुशोभित केला जातो. दारूकामाची आतषबाजी होते. स्त्रिया, पुरुष, मुले, भाविक मंडळी देवाच्या नामघोषात हर्रैयss हर्रैय (हरि-हर) असा गजर करत दुपारच्या रखरखत्या उन्हाची पर्वा न करता नाचत असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे गावकरी मोठ्या आत्मीयतेने स्वागत करतात. जागोजागी तहानलेल्या-भुकेलेल्यांसाठी पाणी, फराळाची सोय केलेली असते. फुलांचे पाचही कळस कणकेश्वरी मंदिराकडे पोहोचेपर्यंत दुपारचे दोन अडीच वाजलेले असतात. मंदिरात फुले पोहोचल्यानंतर देवाचा ध्वज सजविण्यात येतो. एका बांबूच्या अग्रेसर ठिकाणी ध्वज जोडलेला असतो. मंदिराचा दरवाजा बंद असतो. मंदिराबाहेर असंख्य भाविक दरवाजा उघडला जाण्याची प्रतीक्षा करीत असतात. बंद दरवाजावर लोकांचे लक्ष केंद्रित झालेले असते. दरवाजा कधी उघडतो आणि देवदर्शन कधी होते यासाठी सगळे अधीर झालेले असतात. मंदिरातील विधी पूर्ण होताच तो क्षण येतो. मंदिराचे महाद्वार उघडले जाते. तळपता सूर्यही क्षणभर विसावल्याचा भास होतो. नामघोषाने आणि दारूकामाच्या आतषबाजीने सारा नार्वे गाव दुमदुमून जातो. रामरूपी ध्वज व अवसर देव मंदिराबाहेर आल्यावर श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराकडे धावत सुटतो. पारंपरिक डोंगरावरील पायवाटेने जात असताना पुढे हातात बेतकाठी घेऊन धोंडगण नाचत असतात. जागोजागी आतषबाजीने देवांचे स्वागत केले जाते. श्री सप्तकोटेश्वर देवालयाची प्रदक्षिणा पूर्ण करून भेटीसाठी अधीर झालेले कोकोदेव श्री सप्तकोटेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. शिवलिंगाला आलिंगन देऊन एकमेकांना कडकडून भेटतात. शिवपिंडी व थोरल्या देवाची गळाभेट होते. ते एकमेकांना सोडायलाच तयार नसतात. अशावेळी देवांना मुद्दाम बाहेर आणावे लागते. मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून देव मंदिराच्या गाभाऱ्यात जातो. त्यानंतर देवांना ओढ लागलेली असते ती पंचगंगेच्या तीर्थस्थानाची. तेथे गंगेची भेट घेऊन तीर्थस्नान करून देव मूळस्थानी  यायला निघतात.

हेही वाचा