प्रत्येक गावचे वेगळे असे काहीतरी वैशिष्ट्य असते. नार्वे गावचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मसणदेवता’. जत्रेच्या दिवशी नवस फेडण्यासाठी आलेल्या लोकांची येथे गर्दी असते. मृतात्म्यांवर नियंत्रण ठेवणारी मसणदेवता मृण्मयी वारुळ रुपाने पहावयास मिळते.

मानवाने मन:शांती मिळवण्यासाठी निर्माण केलेल्या ‘मंदिर’ या पवित्र जागेमध्ये परमेश्वराचा वास असतो अशी आपली श्रद्धा आहे. गावागावामध्ये अशी अनेक मंदिरे पहावयास मिळतात.
मांडवी नदीच्या काठावर वसलेला, हिरव्यागार वनराईने नटलेला डिचोली तालुक्यातील नार्वे हा निसर्गरम्य गाव. येथे कालभैरव, लक्ष्मीनारायण, कंकेश्वरी, रवळनाथ, महालक्ष्मी अशी मंदिरे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातील प्राचीन श्री सप्तकोटेश्वराचे प्रसिद्ध मंदिरही पहावयास मिळते. नार्वे हे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे अनेक धार्मिक कार्ये केली जातात. गोकुळाष्टमी, महाशिवरात्री या दिवशी मांडवीच्या पंचगंगेमध्ये भाविक लोक तीर्थस्नान करतात. येथे स्नान केल्यास पापकर्म धुऊन जातात व पुण्य मिळते असे म्हणतात.
प्रत्येक गावचे वेगळे असे काहीतरी वैशिष्ट्य असते. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे ‘मसणदेवता’. नार्वे गावात तळेवाडा येथे मसण देवतेचे मंदिर आहे. हा भाग डोंगराळ असून मंदिराचा परिसर स्मशानभूमीने व्यापलेला आहे. मेल्यानंतर माणसावर अंत्यसंस्कार करण्याची जागा म्हणजे ‘मसंड’. याला आपण स्मशानभूमी असे म्हणतो. एरवी आपण मसंड ही जागा भयानक म्हणतो. त्या जागेत विशेषत: कोणी जात नाही पण नार्वे येथील मसण देवतेची जत्रा तर या स्मशानभूमीतच भरते.
‘जन्म-मरण यातून सुटला कोण प्राणिजात,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.’
जन्माला आलेला प्रत्येक जीव हा नाशवंत आहे. या विश्वामध्ये अमर असा कोणीही नाही. पशू-पक्षी, जलचर, खेचर सगळेच मरतात. कुत्रा, मांजर, गुरे-वासरे यांना मुठमाती दिली की संपले. पण माणसाच्या बाबतीत असे होत नाही. माणूस मृत झाल्यावर त्याचा देह नाशवंत होतो; पण आत्मा अमर असतो. माणूस मेल्यानंतर अनेक धार्मिक विधी केले जातात. धार्मिक विधी केल्याने मानवाच्या आत्म्याला मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्रावर अस्थि विसर्जन करुन सर्व विधी तेथेच उरकण्याची प्रथा आहे.
हिंदू धर्मानुसार मृत व्यक्तीचे दहन करतात पण एखाद्या व्यक्तीला आडमृत्यू आला म्हणजेच आत्महत्या, बुडून मृत्यू झाल्यास अथवा बाळंतपणात मृत्यू झाला तर असे देह दफन (पुरतात) करतात. त्यांना चालता बोलता मरण आल्याने त्यांचा आत्मा भूतपिशाच्च बनून इकडे-तिकडे भटकत असतो व इतरांना त्रास देतो असे मानले जाते. अशा आत्म्यांना काबूत ठेवणारी शक्ती मसण देवतेकडे आहे. शिवाय गरोदर असताना, बाळंतपणात, रजस्वला असताना कुणाही महिलेचा मृत्यू झाल्यास तिला दफन करण्याची सोय नार्वे येथे मसण देवतेच्या परिसरात असल्याचे समजते.
मसण देवतेच्या मंदिराशेजारी एक मोठे काजऱ्याचे झाड आहे. त्या झाडाला ठिकठिकाणी खिळे ठोकलेले दिसतात. मृत आत्म्याचे भूतपिशाच्च कुणाही व्यक्तीच्या मानगुटीवर बसू नये म्हणून त्याचा आत्मा दामावर काढून तो दाम खिळ्याने या झाडावर ठोकतात. त्यामुळे आत्मा बंदिस्त होतो व तो कुणाच्याही वाटेला जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कुणाही व्यक्तीला भूतपिशाच्च बाधा झाल्यास ते निवारण करण्याची शक्ती मसण देवतेकडे आहे. तिच्या कृपा प्रसादाने ती नष्ट होऊ शकते.
श्रावण महिन्यातील तिसरा मंगळवार हा मसण देवतेच्या जत्रेचा दिवस. या दिवशी देवीला भाकरी व तायखिळ्याची भाजी याचा नैवेद्य दाखवतात. काजऱ्याचे झाड फुलांनी भरलेले असते. येथील जत्रा दिवसा भरते. सकाळी भरलेली जत्रा संध्याकाळी अंधार पडायच्या आत संपते. अंधार पडल्यानंतर तिथे कुणीच राहत नाही. यानंतर तिथे भुतांची जत्रा भरते. हा एक दिवस काबूत असलेल्या आत्म्यांना देवी बाहेर सोडते. त्यांना जेवण वाढते असे सांगतात. जत्रा संपल्यानंतर संध्याकाळी येथे भाताची भरलेली थाळी व बकरा सोडतात. देवीला गाऱ्हाणे घालून गावकरी व सर्व लोक घरी जातात. पूर्वी तिथे थाळीभर भात व बकरा कापून मटण शिजवत असत. तो सर्व भात व मटण केळीच्या पानावर वाढून ठेवत. त्यानंतर मात्र तिथे कुणीच फिरकत नसत, असे तेथील एका जाणकार ग्रामस्थाकडून समजले.
अशी एक आख्यायिका आहे की, पूर्वी एकदा जत्रेत एक फुलवाली बाई आपल्या लहानग्या मुलासह फुले विकण्यास बसली होती. पण संध्याकाळी गडबडीत अनावधानाने मुलाला तिथेच सोडून घरी गेली. घरी गेल्यावर बाळ सोबत नसल्याचे तिच्या ध्यानात आले, पण अंधार पडल्यामुळे पुन्हा ती देवळाकडेही जाऊ शकत नव्हती. तिने मसणदेवताचा मनातल्या मनात धावा केला आणि आपल्या बाळाचे रक्षण करण्याची विनंती केली. देवतेने तिची हाक ऐकली व त्या रात्री तिच्या लहान मुलाला आपण नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यामध्ये लपवून ठेवले. मसणदेवता ज्यावेळी भुतांना जेवायला वाढू लागली त्यावेळी ते मूल तिच्या ओच्यामध्ये होते. भुतांना त्याचा सुगावा लागलाच ते मोठमोठ्याने ‘मनुष्य-घाण, मनुष्य-घाण’ असे ओरडू लागली व देवतेच्या जवळ येऊ लागली. मसण देवतेने रागाने आपल्या हातात असलेली जेवण वाढण्याची ‘दाय’ त्यांच्यावर उगारुन त्यांना दूर हाकलले व दुसऱ्या दिवशी पहाटे त्या मुलाला सुखरुपपणे त्याच्या घरी पोहचवले. मसणदेवतेच्या कृपेने हरवलेले मूल भूतपिशाच्च यांच्या तावडीत न सापडता आईला सुरक्षितपणे पुन्हा प्राप्त झाल्याने तिच्यावरील श्रद्धा भाविकामध्ये अधिकच दृढ झाली.
मसणदेवता नवसाला पावणारी देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. एखाद्या व्यक्तीला मूलबाळ नसेल तर मसण देवतेला नवस केला असता त्याला मूल होते, असा देवीचा नावलौकिक आहे. जत्रेच्या दिवशी नवस फेडण्यासाठी आलेल्या लोकांची येथे गर्दी असते. मृतात्म्यांवर नियंत्रण ठेवणारी मसणदेवता मृण्मयी वारुळ रुपाने पहावयास मिळते.