‘गोवा ग्राम समृद्धी योजने’द्वारे प्रत्येक मतदारसंघात विकास प्रकल्प

अर्थसंकल्पात २० कोटींहून अधिक निधीची तरतूद! मुख्यमंत्र्याची माहिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
‘गोवा ग्राम समृद्धी योजने’द्वारे प्रत्येक मतदारसंघात विकास प्रकल्प

पणजी: गोव्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गोवा सरकार 'ग्राम समृद्धी योजना' अधिक प्रभावीपणे राबवणार असून, या अंतर्गत प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. आगामी अर्थसंकल्पात या योजनेसाठी गेल्या वर्षीच्या २० कोटींच्या तुलनेत अधिक भरीव तरतूद करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच ग्रामीण विकास यंत्रणेच्या (RDA) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या योजनेचा सविस्तर आढावा घेतला. सध्या राज्यात या योजनेअंतर्गत १३१ प्रकल्प सुरू असून, त्यांच्या प्रगतीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी तपासला. विशेष म्हणजे, यापुढे विकासकामांची निवड करताना स्थानिक आमदारांनी शिफारस केलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लोकांचे कल्याण आणि संतुलित विकास साधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, वाढीव निधीमुळे रखडलेल्या कामांना वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

हेही वाचा