पणजीत कॅसिनोमुळे होणाऱ्या समस्या सोडवण्यास प्राधान्य!

उत्पल पर्रीकर : ‘आमी पणजेकार’ पॅनलतर्फे चाैघांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23 mins ago
पणजीत कॅसिनोमुळे होणाऱ्या समस्या सोडवण्यास प्राधान्य!

पणजी : ‘आमी पणजेकार’ पॅनलतर्फे काही जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मंगळवारी अन्य उमेदवार अर्ज भरतील. आम्ही एकूण २८ उमेदवार देणार आहोत. कॅसिनोमुळे शहरात होणाऱ्या समस्या सोडविण्यास आम्ही प्राधान्य देऊ. पणजीकरांना बदल हवा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आमच्या पॅनलला पाठिंबा मिळेल, असा विश्वास उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी व्यक्त केला.
सोमवारी त्यांच्या पॅनलतर्फे चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उत्पल यांनी सांगितले की, कॅसिनोमुळे पणजीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मूलभूत सुविधांवर ताण येत आहे. कॅसिनोमुळे शहरात वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या निर्माण झाली आहे. या तसेच अन्य सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या समस्या सोडविण्यासाठी सरकारने पणजीसाठी विशेष निधी दिला पाहिजे. पार्किंगमध्ये काही जागा स्थानिकांसाठी आरक्षित असली पाहिजे. पे पार्किंगमधून येणाऱ्या महसुलातून पणजीत पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबत देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत.
पर्रीकर म्हणाले की, आम्ही आमच्या पॅनलच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार आहोत. दोन ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. पक्ष, विचारसरणी यापेक्षा आम्ही उमेदवार पणजीसाठी योग्य आहे का, याचा विचार करून उमेदवारी दिली आहे. पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त पणजी हे आमचे ध्येय आहे. आमचे काही उमेदवार तरुण, तर काही अनुभवी आहेत. आम्ही पणजीच्या हितासाठी १० मुद्दे घेतले होते. यातील जास्तीत जास्त मुद्द्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे.

आतापर्यंत ५७ अर्ज
महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत ५७ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी एकूण २२ जणांनी अर्ज दाखल केले. यात ‘आमी पणजेकार’मधील सहा जणांचा समावेश आहे. यात क्रमांक ६ मधून डॉ. शितल नाईक, प्रभाग क्रमांक १० मधून ॲड. विष्णू नाईक, प्रभाग क्रमांक १२ मधून शबमन खान, प्रभाग क्रमांक १३ मधून नरेश चारी, प्रभाग क्रमांक १६ मधून प्रांजल नाईक, तर प्रभाग क्रमांक ७ मधून लियोनिड फुर्तादो यांनी अर्ज भरले.

महापौरांविरोधात जॉन पो
सोमवारी प्रभाग ४ मधून जॉन पो यांनी अर्ज दाखल केला. त्यांची लढत महापौर रोहित मोन्सेरात यांच्याशी होणार आहे. जॉन यांना ‘आमी पणजेकार’ने पाठिंबा दिला आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक १७ मधून जॅक सुखिजा यांनी अर्ज भरला आहे.             

हेही वाचा