बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, हृदयरोग, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी, युरोलॉजी विभागांचा समावेश

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC Bambolim) आणखी ८ ओपीडींसाठी ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. यात बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, हृदयरोग, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी, युरोलॉजी विभागांचा समावेश आहे. यातील न्यूरोलॉजी आणि ऑन्कोलॉजी विभागांसाठी दिवसाला ५०, तर अन्य विभागांसाठी दिवसाला १०० स्लॉट ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बुकिंगसाठी https://www.gmcgoa.edu.in या संकेतस्थळाचा वापर करावा लागेल.
ऑनलाईन स्लॉट बुक केल्यानंतर गोमेकॉतील संबंधित ओपीडीमध्ये डॉक्टरांच्या उपलब्धतेनुसार सेवा दिल्या जाणार आहेत. या प्रणालीद्वारे विशिष्ट डॉक्टरांच्या अपॉईंटमेंटची सुविधा अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. याशिवाय शिल्लक स्लॉटसाठी ऑफलाईन अपॉईंटमेंट प्रक्रिया सुरूच राहणार आहे. स्लॉट बुकिंग करताना पुढील सात दिवसांच्या कालावधीतील अपॉईंटमेंट घेता येईल. दुसऱ्या दिवशीचे ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग आदल्या दिवशी सायंकाळी ५ वाजता बंद होईल.
या प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद आणि अभिप्रायानुसार अन्य विभागातदेखील अशी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी निर्णय
याआधी गोमेकॉमध्ये मेडिसीन, सर्जरी, त्वचा, ईएनटी आणि अस्थिरोग विभागांच्या ओपीडी बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली होती. गोमेकॉमधील रांगा तसेच प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन स्लॉट बुक झाल्यावर रुग्णाला ऑनलाईन पद्धतीने कन्फर्मेशन स्लिप मिळेल. ही स्लिप गोमेकॉच्या ओपीडीमध्ये दाखवावी लागेल. रुग्णांनी वेळेआधी ३० मिनिटे उपस्थित राहणे आवश्यक आहे.