‘पप्पी’ जुगार घोटाळा प्रकरण : ईडीकडून चौकशी सुरू

पणजी : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बंगळुरू विभागाने २,३०० कोटी रुपयांच्या पप्पी अंदर बाहर बेकायदेशीर आॅनलाईन जुगार घोटाळा प्रकरणी कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी याच्यासह इतरांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. बंगळुरु येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात पृथ्वी एन. राज, केसी थिप्पेस्वामी, मे. फोनपैसा पेमेंट सोल्यूशन्स, गुलशन खट्टर, मे. पप्पीज टुर्स अँड ट्रॅव्हल्स एलएलपी, अर्जुन नागभूषण, अभिजित सज्जन आणि मे. लॉजिकफोर्ज सोल्यूशन्स यांचा समावेश आहे.
गोव्यासह इतर राज्यांत दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने चौकशी सुरू केली होती. त्यात के. सी. वीरेंद्र पप्पी व त्यांचे सहकारी किंग ५६७, राजा ५६७, लायन ५६७ अशा नावाने अनेक सट्टेबाजीची संकेतस्थळे चालवत होते. याशिवाय पप्पी अंदर बाहर जुगार चालवत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. ईडीच्या तपासात वरील संकेतस्थळांमधून तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार अल्पावधीत झाल्याचे समोर आले. मिळालेला निधी विविध गेटवे व बोगस खात्यांद्वारे वळवून हवालामार्गे परदेशात पाठवत असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीने पीएमएलए कायदा, २००२ अंतर्गत के.सी. वीरेंद्र पप्पी याला अटक केली. तसेच गोव्यासह इतर राज्यांतील वीरेंद्र याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या आस्थापनांवर छापे टाकले. पाच हाय-एंड गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्यात मर्सिडीज बेंझसह व्हीआयपी क्रमांकाच्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय ईडीने तब्बल ५५ कोटी रुपयांची रक्कम असलेली बँक खाती गोठवली. यात ४०.६९ कोटी रुपये नऊ बँक खात्यांमध्ये व एक डिमॅट खात्यात असल्याचे उघड झाले. तसेच १४.४६ कोटी रुपये सुमारे २६२ म्युल खात्यांमधून जप्त केले.
त्यानंतर १८ ऑक्टोबर २०२५ रोजी ईडीने बंगळुरु येथील विशेष न्यायालयात प्राथमिक आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रानंतर चौकशी सुरू ठेवत आता पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
आतापर्यंत १५० कोटींचे सोने, इतर वस्तू जप्त
के. सी. वीरेंद्र पप्पी याच्या चल्लाकेरे येथील दोन लॉकरची झडती घेतली. लॉकरमधून ईडीच्या पथकाने सुमारे ४० किलो २४ कॅरेट सोने जप्त केले. या सोन्याची किंमत अंदाजे ५०.३३ कोटी एवढी आहे. ईडीने आतापर्यंत या प्रकरणात १५० कोटी रुपये किमतीचे सोने आणि इतर वस्तू जप्त केल्या.