अभिजित प्रभुदेसाई : ‘जलस्रोत’चे अधिकारी, कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी

सांगे : मिराबाग-सावर्डे येथे प्रस्तावित बंधाऱ्याविरोधात गेल्या १५ दिवसांपासून स्थानिक नागरिक धरणे आंदोलनास बसले आहेत; मात्र सरकारला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. या बंधाऱ्याविषयी स्थानिकांनी जलस्रोत खात्याकडे जी माहिती मागितली, ती त्यांच्याकडे उपलब्धच नाही. खात्याने दिलेली त्रोटक कागदपत्रे पाहता, त्या जमिनीवर सरकारचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट होत आहे. ती जमीन चौगुले कंपनीची किंवा सरकारची नसून गावकऱ्यांची आहे, असा दावा पर्यावरण कार्यकर्ते अभिजित प्रभुदेसाई यांनी केला आहे.
अभिजित प्रभुदेसाई पुढे म्हणाले की, जलस्रोत खाते आणि कंत्राटदाराने या जमिनीवर बेकायदेशीर प्रवेश करून जागेची नासाडी केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर एफआयआर दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्याची गरज आहे. सरकारकडे या बंधाऱ्याचा कोणताही तांत्रिक अभ्यास किंवा माहिती उपलब्ध नाही. केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी किंवा वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशांमुळे हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते की, या जागेत बंधारा होऊच शकत नाही. जमिनीची मालकी आणि तपशील नसताना सरकारने हा प्रकल्प त्वरित मागे घेणे आवश्यक आहे.
सरकार आणि पंचायत लोकांच्या विरोधात!
सरकारच कायदा मोडत असेल तर लोकांनी कोणाकडे पाहायचे? लोकांच्या हक्काच्या जागेत घुसून नासाडी केली जात असताना, कायदा कोण राखणार? हे बेकायदेशीर काम थांबवणे पंचायतीचे कर्तव्य आहे; मात्र सरकार आणि पंचायत दोन्ही लोकांच्या विरोधात काम करत आहेत, अशी टीकाही प्रभुदेसाई यांनी केली.
कंत्राटदारावर खनिज चोरीचा आरोप
यावेळी संकेत भंडारी म्हणाले की, ज्या जागेत मोठा खड्डा खणला आहे, ती गावातील लोकांची जमीन आहे. तिथे काम करण्याची कोणतीही रितसर परवानगी घेण्यात आलेली नाही. हा कंत्राटदार खाणमाती चोरण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कुडचडे पोलीस स्थानकात बुधवारी सकाळी ११ वाजता तक्रार दाखल केली जाईल, तसेच खाण खात्याकडेही दाद मागितली जाईल.
कंत्राटदाराला अटक करण्याची मागणी
बेकायदेशीर काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून अटक करावी. खड्डा खणून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि खनिज चोरणाऱ्या कंत्राटदाराचा आम्ही निषेध करतो, असे संकेत भंडारी यांनी सांगितले.