आमदार वीरेश पुन्हा आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी

मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात येऊन वीरेशची भेट घ्यावी : मनोज परब

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
आमदार वीरेश पुन्हा आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी

पणजी : कलम ३९ (३)  हटवण्यासाठी, गोव्यातील जमिनी राखून ठेवण्यासाठी आणि आमदार वीरेश बोरकर (Viresh Borkar) यांना फरफटत कार्यालयाबाहेर काढणाऱ्या पोलिसांवर (Police) कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन आज मंगळवारी ही सुरू आहे. आंदोलनात उपोषण सुरू केल्यानंतर काल रात्री उशीरा प्रकृती खालावू लागल्याने; इस्पीतळात दाखल करण्यात आलेले आमदार वीरेश बोरकर आज सकाळी पुन्हा या आंदोलनात सहभागी झाले. 


गेल्या काही दिवसांपासून पणजीतील (Panjim) आझाद मैदानावर (Azad Maidan)  हे आंदोलन सुरू आहे.  इस्पीतळात दाखल करण्यात आलेले आमदार वीरेश बोरकर व तुषार गावस आज सकाळी ११ वाजता आंदोलनात पुन्हा सहभागी झाले.

मुख्यमंत्र्यांनी वीरेशची भेट घ्यावी : मनोज परब

आमदार वीरेश बोरकर यांची प्रकृती सध्या स्थिर असून, मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात येऊन त्यांची भेट घ्यावी, असे आरजी प्रमुख मनोज परब यांनी सांगितले.  बोरकर यांच्या अन्य वैद्यकीय चाचण्यांबाबत डॉ. ऑस्कर रिबेलो थोड्या वेळात माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


कलम ३९ अ हटवण्यासहीत संबंधित तत्सम मागण्यांसाठी  गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. पणजीतील नगरनियोजन खात्यात हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. तेथून आमदार वीरेश बोरकर व इतरांना पोलीस बळ वापरून हटवण्यात आल्यानंतर पणजीतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू झाले. त्यानंतर त्याला वाढता प्रतिसाद मिळत गेला.  काल सोमवारी या आंदोलनाने उग्र रुप घेतले. पोलिसांना चकवा देत आंदोलनकर्त्यांनी दोनापावल येथील मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. रात्री उशीरा पर्यंत आंदोलन सुरू होते. 


दरम्यान, सध्या हे आंदोलन गोव्यात सर्वत्र पसरले असून,  विविध स्तरातून या आंदोलनाला समर्थन मिळू लागले आहे. मोठ्या संख्येने लोक आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. 

हेही वाचा