बाप-लेकाने केला पणजीचा विनाश : वाल्मिकी नाईक; आपचा ‘आमी पणजेकार’ला पाठींबा


3 hours ago
बाप-लेकाने केला पणजीचा विनाश : वाल्मिकी नाईक; आपचा ‘आमी पणजेकार’ला पाठींबा

पणजी : गोव्यातील (Goa) पणजी (Panjim) शहर १८० वर्षे जुने आहे. या कालावधीत पणजीमध्ये विविध पक्षांनी, देशाने राज्य केले. मात्र; मागील पाच वर्षांत बाप आणि मुलाच्या जोडीने पणजीचा विनाश केला आहे. या जोडीपासून पणजीला वाचवण्यासाठी आम आदमी पक्ष (Aap) आमी पणजेकार पॅनलला पाठिंबा देत असल्याचे आप प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दत्तप्रसाद नाईक, सुरेंद्र फुर्तादो उपस्थित होते. वाल्मिकी नाईक म्हणाले की, पणजीत बाप मुलाचे फॅमिली राजने स्थानिकांना त्रास होत आहे. हे संपवले नाही तर एक दिवस पणजीकरांनाच येथून बाहेर पडावे लागेल. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे.

आमी पणजेकारला याआधी वेगवगेळी विचारसरणी असलेल्या लोकांनी, पक्षांनी पाठिंबा दिला आहे.  त्यामुळे आम्ही देखील या पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पणजीकरांनी महापालिका निवडणुकीत आमी पणजेकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे. 

दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले की, मागील एका वर्षापासून आम्ही समविचारी लोकांशी बोलणी करत आहोत. आम्ही सर्व प्रभागात उमेदवार दिले आहेत. त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील. आमच्या पॅनलमधील उमेदवारांना प्रस्तावक म्हणून राहू नये यासाठी धमक्या येत आहेत.

राज्यातील ठराविक चार ते पाच कुटुंबांनी गोव्याची वाट लावली आहे.  हे मतदान म्हणजे त्यातील एका कुटुंबाला सत्तेबाहेर करण्याची आम्हाला एक संधी आहे. यासाठीच स्थानिकांनी आमच्या पॅनलला पाठिंबा द्यावा. प्रभाग फेररचनेत स्थानिकांवर अन्याय

दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, प्रभाग फेररचनेत स्थानिकांवर अन्याय झाला आहे. प्रभाग १ महिला एसटी, प्रभाग २ आणि ३ महिला ओबीसी करून तेथील स्थानिकांना निवडणूक लढवण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

जाहीरनामा लवकरच 

आमच्या पॅनेलचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाणार आहे. याबाबत आम्ही आमी पणजेकार संकेतस्थळावर एक फॉर्म अपलोड केला आहे. यावर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून जाहीरनामा तयार केला जाईल; असे दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले.


हेही वाचा