तोडगा नाहीच : आमदार वीरेशसह ग्रामस्थांचा आझाद मैदानावर ठिय्या

मंत्र्यांच्या घरावरील मोर्चावरून मनोज-विजयमध्ये नवा वाद

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
22 mins ago
तोडगा नाहीच : आमदार वीरेशसह ग्रामस्थांचा आझाद मैदानावर ठिय्या

पणजी : नगरनियोजन (TCP) कायद्यातील कलम ३९ अ रद्द करणे वा पाळे शिरदोनमधील झोन बदल रद्द करण्याबाबत सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आमदार वीरेश बोरकरसह ग्रामस्थांचे आंदोलन आझाद मैदानावर (Azad Maidan) मंगळवारीही सुरूच आहे. ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहेत तर सरकारकडूनही (Government)  चर्चेबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याने तोडग्याची तूर्त तरी शक्यता नाही.  नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर काढलेल्या मोर्चावरून आता आरजीचे प्रमुख (RG) मनोज परब व गोवा फॉरवर्डचे (Goa Forward)  आमदार विजय सरदेसाई यांच्यात नवा वाद निर्माण झाला आहे. 

पाळे शिरदोन येथील झोन बदलाच्या मागणीसाठी आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी पाटो येथील नगरनियोजन खात्याच्या इमारतीत ठिय्या दिल्यानंतर शनिवारी ग्रामस्थांना बाहेर काढण्यात आले होते. तद्नंतर आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले. सोमवारी सायंकाळी सर्वपक्षीय आंदोलनाची हाक दिली असतानाच अचानक मंत्री विश्वजित राणे यांच्या घरावर मोर्चा नेण्यात आला. यानंतर सोमवारी रात्री ग्रामस्थांनी पुन्हा आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. तब्येत बिघडल्याने सोमवारी रात्री खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले आमदार वीरेश बोरकर यांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर पुन्हा ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनप्रश्नी तोडगा वा चर्चेबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याने आंदोलन सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

मनोज-विजयमध्ये आरोपप्रत्यारोप

मंत्र्याच्या खासगी बंगल्यावर मोर्चा नेणे अयोग्य असल्याचे सांगून आमदार विजय सरदेसाई यांनी मोर्चातून माघार घेतली होती. यावरून आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी त्यांच्यावर मंगळवारी कडक शब्दात टीका केली. राज्यातील जमीन रूपांतरणाची सुरवात कलम १६ ब व्दारे विजय सरदेसाई यांनी केली. ३९ अ ला विरोध झाला तेव्हाही ते नव्हते. कोण खोटारडेपणा करतो, हे आता समजले आहे, असा आरोप आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केला आहे.

मंत्र्याच्या खासगी घरावर मोर्चा नेणे अयोग्य आहे. लोकांना ७ किमी चालायला लावणे म्हणजे ती काही गुरे नव्हेत. यात लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. जमीन रूपांतरणाच्या आरोपाला मात्र त्यांनी प्रत्युत्तर दिलेले नाही. ज्याने आरोप केला आहे, तो उत्तर देण्याच्या पात्रतेचा नाही, ऐवढेच ते म्हणाले.

कोण खोटारडेपणा करतो ते उघड : मनोज परब, आरजी प्रमुख

गोव्यात जमीन रूपांतरणाची सुरूवात १६ ब व्दारे विजय सरदेसाई यांनी केली. ३९ अ ला विरोध झाला तेव्हाही ते नव्हते. कोण खोटारडेपणा करतो, ते आता स्पष्ट झाले असल्याचे आरजी प्रमुख मनोज परब म्हणाले. 

लोक म्हणजे गुरे नव्हेत : विजय सरदेसाई

मंत्र्यांच्या घरावर मोर्चा नेणे अयोग्य आहे. लोकांना ७ किमी चालायला लावणे म्हणजे ती काही गुरे नव्हेत.  माझ्यावर आरोप ज्याने केला आहे, तो उत्तर देण्याच्या पात्रतेचा नसल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. 




हेही वाचा