
पणजी : बार्देश तालुक्यातील (Bardez Taluka) जमीन घोटाळ्यांची (Scams) मालिका अद्यापही सुरूच आहे. नेरूळ (Nerul) येथे जमीन नोंदीतील आणखी एक गंभीर विसंगती उघडकीस आली आहे. शासन नियुक्त एसआयटीकडून (SIT) अनेक प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच या नव्या प्रकारामुळे महसूल नोंदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेरुळमधील एका मालमत्तेची नोंद दोन जवळपास एकसारख्या सर्व्हे (Survey number) क्रमांकांखाली करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित मालमत्ता सर्वे क्रमांक ९८ १/ए आणि ९८ १ ए अशा दोन वेगवेगळ्या नोंदींमध्ये दिसत असून, दोन्ही नोंदींमध्ये भिन्न भोगवटेदार नमूद आहेत.
सर्व्हे क्रमांक ९८ १/ए संदर्भातील फॉर्म १ आणि १४ मध्ये मारिओ रॉय दो रोझारिया डी सोझा यांचे नाव भोगवटेदार म्हणून नमूद आहे. तर सर्वे क्रमांक ९८ १ ए च्या फॉर्म १ आणि १४ मध्ये सम्यक मेटल्स प्रा. लि. यांच्यासह प्रशांत जेटली, संजय कुमार चौधरी आणि देवेंद्र कुमार स्वामी यांची नावे भोगवटेदार म्हणून नोंदवलेली आहेत.
या विसंगतीमुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही संभ्रम निर्माण झाला आहे. सर्व्हे व जमीन नोंदी निरीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या नोंदींमध्ये केवळ सर्वे क्रमांक ९८१ ए आहे. “आमच्या कार्यालयात एकच सर्व्हे क्रमांक नोंदवलेला आहे. फॉर्म १ आणि १४ जारी करणाऱ्या मामलेदार कार्यालयात काहीतरी तांत्रिक अडचण असू शकते,” असे एका अधिकाऱ्याने नमूद केले.
सर्व्हे व जमीन नोंदी निरीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या नोंदींमध्ये केवळ सर्व्हे क्रमांक ९८ १ए दर्शविला जात आहे. “आमच्या कार्यालयात एकच सर्व्हे क्रमांक नोंदवलेला आहे. फॉर्म १ आणि १४ जारी करणाऱ्या मामलेदार कार्यालयात काहीतरी तांत्रिक अडचण असू शकते,” असे एका अधिकाऱ्याने नमूद केले.
मात्र, मामलेदार कार्यालयात चौकशी केल्यानंतर प्रकरण अधिक गुंतागुंतीचे असल्याचे दिसून आले. संबंधित लिपिकाने अधिकृत प्रणाली तपासल्यानंतर एकाच मालमत्तेसाठी दोन्ही सर्व्हे क्रमांक प्रणालीमध्ये दिसत असल्याची कबुली दिली. “माझ्या कारकिर्दीत प्रथमच असे प्रकरण पाहत आहे. या संदर्भात अधिक माहिती मामलेदार देऊ शकतील,” असे त्यांनी सांगितले.
नेरूळसंबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या संयुक्त मामलेदार रुचिका बिर्जे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता; त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, या मालमत्तेत वास्तव्यास असलेल्या एका मुंडकाराने आपल्या मुंडकारी हक्कांसाठी दावा केल्यानंतर ही विसंगती उघडकीस आली. या प्रकारामुळे संबंधित मालमत्तेच्या हक्कांबाबत आणि जमीन नोंदींच्या अचूकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.