नार्वेतील गंगा घाट आरती प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम पाठिंबा

आमदार फळदेसाईंच्या विरोधाबाबत नाराजी : नार्वे, मयेतील ग्रामस्थ एकवटले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 mins ago
नार्वेतील गंगा घाट आरती प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम पाठिंबा

डिचोली : नार्वे येथे प्रस्तावित गंगा घाट आरती प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शवित कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेल्या विरोधाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद्र शेट आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गंगा आरती घाट हा प्रकल्प आखून त्याचे कामही सुरू केले असून त्याला कोणीही विरोध करू नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
यावेळी भाजप गट अध्यक्ष संदेश पार्सेकर, विश्वास चोडणकर, संदीप पार्सेकर, सरपंच तुकाराम गावडे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमुखाने सांगितले की, गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पाला केवळ स्मशानभूमीच्या कारणावरून विरोध करणे योग्य नाही.
विश्वास चोडणकर म्हणाले, येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. पंचगंगा नदीच्या संगमामुळे या परिसराला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गंगा घाट आरती प्रकल्प राबविणे ही गावाच्या विकासासाठी आणि पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
बाहेरील कोणीही येऊन आमच्या गावातील विकास प्रकल्पांना विरोध करू नये, असा इशारा नार्वे येथील नागरिकांनी दिला. विकासकामांना राजकीय स्वरूप न देता संवादातून मार्ग काढावा, अशी मागणी संदेश पार्सेकर, संदीप पार्सेकर, तुकाराम गावडे आणि उपस्थित ग्रामस्थांनी केली.

स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून विरोध अयोग्य
सध्या ज्या जागी गंगा घाट आरती प्रकल्प प्रस्तावित आहे, त्या ठिकाणी असलेली स्मशानभूमी कुंभारजुवे मतदारसंघातील दुसऱ्या भागातील नागरिकांकडून वापरली जाते, अशी माहिती संदीप आणि संदेश पार्सेकर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी दिली. केवळ स्मशानभूमीचा मुद्दा पुढे करून संपूर्ण प्रकल्पाला विरोध करणे योग्य नसल्याचे मत विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केले. संबंधित स्मशानभूमीची पर्यायी व्यवस्था आमदार राजेश फळदेसाई यांनी आपल्या मतदारसंघात करावी, अशी सूचनाही ग्रामस्थांकडून करण्यात आली.

हेही वाचा