आंदोलकांच्या आरोग्याची सुरक्षा राखण्यासाठी आयोजकांनी लावले 'नो शेकहँड'चे फलक

पणजी: नगरनियोजन कायद्याच्या कलम '३९ ए' विरोधात आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. उपोषणास बसलेले आंदोलक आणि तिथे जमणारी गर्दी लक्षात घेता, संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आंदोलनस्थळी कडक आरोग्यविषयक खबरदारी घेण्यात आली आहे. आंदोलकांच्या आरोग्याची सुरक्षा राखण्यासाठी आयोजकांनी ठिकठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे फलक लावले आहेत.
मैदानावर येणाऱ्या समर्थकांना आणि अभ्यागतांना आंदोलकांशी हस्तांदोलन न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संसर्ग रोखण्यासाठी 'नो शेकहँड' आणि 'प्रवेश मर्यादित' अशा आशयाचे फलक लावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लांबूनच अभिवादन करून आंदोलकांना सहकार्य करावे, जेणेकरून त्यांची प्रकृती स्थिर राहील आणि त्यांना आपला लढा सुरू ठेवण्यासाठी पुरेशी शक्ती मिळेल, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. उपोषणामुळे आंदोलकांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, हे ओळखून शिस्त आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे.
दरम्यान, आमदार वीरेश बोरकर व्हीलचेअरवरून 'अर्थसंकल्प सल्लागार समिती'च्या बैठकीसाठी गोवा विधानसभेत दाखल झाले आहेत. आज दुपारी नियोजित असलेली मंत्रीमंडळाची बैठक सायंकाळी ४ वाजता पार पडणार आहे.
बातमी अपडेट होत आहे.