जुवे येथे नवा पूल उभारण्याची स्थानिकांची मागणी; पीडब्ल्यूडीकडून पाहणी करण्याचे आश्वासन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
जुवे येथे नवा पूल उभारण्याची स्थानिकांची मागणी; पीडब्ल्यूडीकडून पाहणी करण्याचे आश्वासन

 म्हापसा :  तिसवाडी तालुक्यातील (Tiswadi Taluka) जुवे (Juvem) येथे नवा पूल उभारण्याची प्रलंबित मागणी पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. कित्येक वेळा नवा पूल  उभारण्याचे आश्वासन देऊनही ही मागणी अजून प्रलंबित आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) (PWD) अधिकाऱ्यांची भेट घेतली.

८ ते १० दिवसांत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून पुलाच्या प्रस्तावित आराखड्याची (अलाईनमेंट) तपासणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. जुवे येथील जुना पूल (Old Bridge) काही काळापूर्वी अस्थिरतेच्या कारणास्तव ‘वाहनांसाठी अयोग्य’ (नॉन-मोटरेबल) घोषित करण्यात आला होता. पुलाची स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याने ग्रामस्थांनी नव्या पुलाची मागणी सातत्याने लावून धरली आहे. यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

मंगळवारी काही स्थानिकांनी म्हापसा (Mapusa) येथे सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांची भेट घेऊन प्रस्तावाच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रस्ताव प्रक्रियेत असून सीआरझेड (CRZ) तसेच इतर संबंधित प्राधिकरणांची परवानगी आवश्यक आहे. पुलाच्या अलाईनमेंट व रुंदीबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर बेटावर प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रतिनिधींनी कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरूनही चर्चा करून अधिक माहिती घेतली.

स्थानिक रहिवासी गौरीश हळर्णकर यांनी सांगितले की, “जुवे बेटाला मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पुलाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. सध्या असलेल्या पुलाची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याने नव्या पुलाचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी आमची मागणी आहे. अधिकाऱ्यांनी ८–१० दिवसांत पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रस्तावित पुलाबाबत सविस्तर सादरीकरण द्यावे, अशीही आमची मागणी आहे, कारण पुलाच्या उताराजवळ (लँडिंग पॉइंट) उपलब्ध जागा मर्यादित आहे.”

दरम्यान, प्रत्यक्ष पाहणीनंतर पुलाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा जुवे येथील ग्रामस्थांनी  व्यक्त केली आहे.


हेही वाचा