
पणजी: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (Goa State Pollution Control Board) ध्वनीप्रदूषणावर कडक कारवाई सुरू केली आहे. सप्टेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या ९०० हून अधिक ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याची सूचना गोवा पोलीस (Goa Police) व जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collectorate) दिली आहे.
ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणांना पत्रे पाठवून प्रगतीचा आढावा घेणे सुरू केले आहे. किनारपट्टी भागातील ३८ ‘मॉनिटरिंग सिस्टीम’द्वारे ध्वनीप्रदूषण नियमाच्या ७५० उल्लंघनांची नोंद झाली. हेल्पलाईन क्रमांक ८९५६४८७९३८ वर १३५ तक्रारी प्राप्त झाल्या तर नागरिकांनी थेट दाखल केलेल्या ५० तक्रारींचा यात समावेश आहे.
काही प्रकरणांत पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाले असून, त्यांचा आढावा घेणे सुरू आहे. उर्वरित तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी जीएसपीसीबीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे सूचित केले आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा २००० अंतर्गत १७ आस्थापनांकडूक एकूण १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आली आहे. २८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
ध्वनीप्रदूषणासंबंधी तक्रारी नागरिक जीएसपीसीबीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ८९५६४८७९३८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून नोंदवू शकतात.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.