
इस्लामाबाद/काबूल : वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने (Pakistan) शनिवारी मध्यरात्री अफगाणिस्तान (Afganistan) सीमेजवळील दहशतवादी (Terrorist) तळांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने हे हल्ले “गुप्तचर माहितीवर आधारित आणि निवडक कारवाई” असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार ( Attaullah Tarar) यांनी ‘ट्वीटर’वरील पोस्टमध्ये सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने तेहरीक-इ-तालीबान पाकिस्तान (Tehreek-e-Taliban Pakistan) (टीटीपी) आणि त्याच्या संलग्न सात तळांवर कारवाई केली. सीमाभागात इस्लामिक स्टेटच्या एका गटालाही लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र; अफगाणिस्तान सरकारने या हल्ल्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. काबूलमधील सरकारचे प्रवक्ते झबीहुल्लाह मुजाहीद (Zabihullah Mujahid) यांनी सांगितले की, पाकिस्तानने अफगाणिस्तानातील नंगरहार आणि पक्तिका प्रांतांमध्ये हल्ले केले असून; त्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक ठार व जखमी झाले आहेत. पाकिस्तान आपले अंतर्गत सुरक्षा अपयश झाकण्यासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अलीकडेच खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बजौर जिल्ह्यात आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा चौकीवर आदळवले होते. या स्फोटात ११ सैनिक आणि एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर बन्नू जिल्ह्यातही सुरक्षा ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला, ज्यात दोन जवान ठार झाले. या हल्ल्यांमागे अफगाणिस्तानातील नेतृत्वाच्या सूचनेवरून दहशतवादी गट कार्यरत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानने यापूर्वीही ऑक्टोबरमध्ये अफगाणिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली होती. दोहा करारानुसार अफगाण भूमीचा वापर इतर देशांविरुद्ध होऊ नये, अशी आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाण तालिबान प्रशासनावर जबाबदारी टाकावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे.
दरम्यान, २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. सीमावाद, दहशतवादी कारवाया आणि परस्पर आरोपांमुळे इस्लामाबाद आणि काबूल यांच्यातील संबंध आणखी बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.