‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सरकार विवाह नोंदणी नियमात दुरुस्ती करणार

गुजरात : गुजरातमध्ये (Gujarat) आता लग्न (Marriage) करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घ्यावी लागणार आहे. गुजरात सरकारने विवाह नोंदणी नियमांमध्ये मोठी दुरुस्ती प्रस्तावित केली आहे. लव्ह जिहाद प्रकरणांना रोखण्यासाठी हे बदल करण्यात येत असल्याचे कारण सरकारने दिले आहे.
महाराष्ट्रात सध्या भिगवण प्रकरण गाजत असतानाच गुजरातमध्ये कथित लव्ह जिहाद (Love Jihad) प्रकरणे रोखण्यासाठी गुजरात सरकार मोठे पाऊल उचलत आहेत. गुजरात सरकारने (Gujarat Government) शुक्रवारी विवाह नोंदणी कायदा, २००६ मध्ये सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत.
त्यात विवाह नोंदणीसाठी आता पालकांची संमती सक्तीची करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. राज्यात लव्ह जिहादच्या नावाखाली एक खेळ सुरू आहे. त्यामुळे तरूण मुलींसाठी एक मजबूत कवच तयार करणे गरजेचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
या सुधारणा विधानसभेत सादर करताना उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी म्हटले आहे की, एकही मुस्लीम किंवा मशीद पंचमहल जिल्ह्यात नव्हती. अशी स्थिती असतानाही शेकडो निकाह प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. नवसारी, बनासकांठा, मेहसाणा जिल्ह्यांत असे प्रकार घडल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, विवाह नोंदणी कायद्यातील या सुधारणेचे महत्त्व आहे. प्रेम विवाहांच्या विरोधात सरकार नाही. मात्र, मुलींच्या प्रतिष्ठेचे आणि सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी ही दुरूस्ती प्रस्तावित करत आहेत.
विवाह नोंदणी कायद्यात खालील सुधारणा
विवाह नोंदणीची प्रक्रिया करताना आता पालकांची संमती अनिवार्य करण्याचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. विवाह नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर मुलामुलीच्या पालकांना व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे अधिकृतपणे कळवण्यात येणार आहे. प्रस्तावात नमुद केल्याप्रमाणे, सहाय्यक निबंधकांच्या पुष्टीकरणानंतर दहा दिवसांच्या आत वधू वरांच्या पालकांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक किंवा सरकारने विहित केलेल्या माध्यमाद्वारे ही माहिती दिली जाणार आहे.