नीट परीक्षेच्या दबावातून मुलाने वडिलांची गोळ्या झाडून केली हत्या

लखनऊ मधील ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाने खळबळ; मृतदेहाचे तुकडे करून घरात लपवले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
59 mins ago
नीट परीक्षेच्या दबावातून मुलाने वडिलांची गोळ्या झाडून केली हत्या

लखनऊ : लखनऊ (Luknow), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांची (Father) गोळ्या  झाडून हत्या केली.  त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून घरातील निळ्या ड्रममध्ये (Blue Drum) लपविले.  करिअरच्या वादातून ही भीषण घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वडील मुलाला नीट (NEET)  परीक्षा देण्यासाठी दबाव टाकत होते. त्यातूनच हे हत्याकांड घडले.

मृत व्यक्ती पॅथॉलॉजी लॅबचे मालक होते. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगा आणि वडील यांच्यात त्याच्या भविष्यातील करिअरवरून वारंवार वाद होत होते. वडील मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी नीट (‘एनईईटी’) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दबाव टाकत होते. याच कारणावरून संतप्त झालेल्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली चौकशीदरम्यान दिली आहे.

पोलिसांची कारवाई आणि तपास

मध्य विभागाचे डीसीपी विक्रांत वीर यांनी सांगितले की, संशयिताची विधाने विसंगत आढळल्याने पोलिसांना संशय आला. कठोर चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित मृतदेहाचे अवशेष हटवण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केला.

सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्या घरावर छापा टाकला. तेव्हा निळ्या ड्रममध्ये ठेवलेले मृतदेहाचे अवशेष जप्त करण्यात आले. गोळीबार झालेल्या खोलीतून परावर्तित झालेली गोळी (रिकोशे) जप्त करण्यात आली असून; रायफल आणि गोळी फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आल्या आहेत. घर आणि कारमधील रक्ताचे डाग तपासले जात असून, उर्वरित अवशेषांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.

बहिणीसमोरच गोळीबार

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या बहिणीसमोरच वडिलांवर गोळी झाडली आणि तिला गप्प राहण्याची धमकी दिली. कुटुंबात दोन भाऊ आणि इयत्ता अकरावीमध्ये शिकणारी मुलगी आहे. संशयिताचा लहान भाऊ उत्तर प्रदेश पोलिसांत कार्यरत असून; सचिवालयात नियुक्त आहे. मृत व्यक्ती मूळचे जालौन जिल्ह्यातील आहे.  त्यांच्या पत्नीचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले होते.

संशयित ताब्यात

या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी अटक केली असून; पुढील तपास सुरू आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळाची सखोल तपासणी करत आहे.  उर्वरित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 


हेही वाचा